औरंगाबाद - शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या बातमीने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने अब्दुल सत्तार नाराज असल्याचं समोर आलं. त्यानंतर सत्तारांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांना पाचारण करण्यात आलं. एका हॉटेलमध्ये खोतकर आणि सत्तार यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाली. सकाळपासून हॉटेलमध्ये असणारे अब्दुल सत्तार तब्बल ९ तासानंतर हॉटेलच्या बाहेर पडले.
त्यावेळी माध्यमाशी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, मी राजीनामा दिला असं कोणी सांगितलं नाही. माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या जात आहेत. मी आज कोणालाही काहीही उत्तर देणार नाही, वेळ येईल तेव्हा सर्व प्रश्नाची उत्तरं देईन, मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, उद्धवजींशी चर्चा करुन बोलेन अशी भूमिका सत्तारांनी मांडली.
तर 'माझा कंट्रोल ‘मातोश्री’वर' आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी बोलल्यानंतर मी भाष्य करेन, उद्या दुपारी आमची भेट होणार आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या राजीनाम्याच्या बातम्या बंद करा असंही अब्दुल सत्तारांनी माध्यमांना सांगितलं. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरुन औरंगाबाद शिवसेनेत दुफळी माजल्याचं दिसून आलं. त्याचाच परिणाम म्हणून अध्यक्षपदी काँग्रेसच्या मीना शेळके विजयी झाल्या तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. महाविकास आघाडीची २ मते फुटल्याने त्याचा फायदा भाजपाच्या एलजी गायकवाड यांना झाला.
दरम्यान, शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार तोंडसुख घेतलं. सत्तार हे गद्दार आहे. त्यांना मातोश्रीची पायरी चढू देऊ नका असं त्यांनी पक्षनेतृत्वाकडे विनंती केली. तसेच अब्दुल सत्तार यांना भाजपाला मदत करायची होती तर शिवसेनेत कशाला आला? हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीत उभं राहून दाखवा असं आव्हानही खैरेंनी अब्दुल सत्तारांना दिलं. सत्तारांच्या राजीनाम्यानंतर विरोधी भाजपानेही ठाकरे सरकारवर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. या सरकारच्या पतनाची सुरुवात सरकार बनण्याच्या आतच सुरू झाली आहे अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.
महत्त्वाच्या बातम्या
अखेर, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं खातेवाटप ठरलं; संपूर्ण यादी 'लोकमत'च्या हाती
गेले दोन महिने राज्यातील सर्वसामान्य माणूस देवाच्या भरवशावर : चंद्रकांत पाटील
एकाच बॅनरवर झळकले नरेंद्र मोदी-राज ठाकरेंचे फोटो; भाजपा-मनसे नव्या मैत्रीचा अध्याय?
अब्दुल सत्तार गद्दार, त्यांना मातोश्रीची पायरी चढू देणार नाही - चंद्रकांत खैरेंची टीका
सध्या राज्यातील भाजपाची अवस्था म्हणजे पाण्याविना मासा: बाळासाहेब थोरात