मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईसाठी असलेले योगदान लक्षात घेता दक्षिण मुंबईत त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या प्रस्तावाला गटनेत्यांच्या सभेत मान्यता देण्यात आली. महापालिकेतील गटनेत्यांची सभा शुकवारी महापौर दालनात पार पडली. त्यावेळी या विषयासंदर्भात स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी महापौरांना लिहिलेले पत्र सभेपुढे विचारार्थ ठेवण्यात आले होते. त्यावर ही मान्यता देण्यात आली.स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुंबई शहराच्या जडणघडणीत अनेक दिग्गजांचे योगदान आहे. त्यात शिवसेनाप्रमुखांचेही नाव अग्रेसर आहे. सर्वप्रथम एक कलाकार, व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेची सुरुवात केलेल्या बाळासाहेब ठाकरे यांची अल्पावधीतच जागतिक दर्जाचे व्यंगचित्रकार म्हणून ते ख्यातकीर्त झाले. मुंबईला स्वत:ची ओळख मिळावी, यासाठी त्यांनी जनआंदोलने केली. शिवाय त्यांनी ‘मार्मिक’ साप्ताहिकातून रेखाटलेली व्यंगचित्रे व परखड अग्रलेख लोकप्रिय झाल्याचे या पत्रात म्हटले आहे.मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी निर्माण झालेल्या शिवसेना पक्षाच्या स्थापनेमध्ये ‘मार्मिक’चे मोठे योगदान आहे. ‘सामना’तून ठाकरे यांनी मांडलेल्या विचारांची सरकारला दखलही घ्यावी लागली. ‘मार्मिक’ आणि ‘सामना’ या दोन मुखपत्रांद्वारे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला बळ प्राप्त झाले. राज्यातील सरकारी व निमसरकारी आस्थापनांमध्ये स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांनी लढा दिला. कुशल संघटक, कलाप्रेमी, प्रभावी वक्ता, उत्कृष्ट व्यंगचित्रकार अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या शिवसेनाप्रमुखांचे आकर्षण जगभरातील नागरिकांना होते. म्हणूनच त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांची कर्मभूमी असलेल्या मुंबई शहरात, दक्षिण मुंबईमध्ये त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, असे फणसे यांनी या पत्रात नमूद केले होते. त्याला बैठकीत एकमताने मंजुरी मिळाली. (प्रतिनिधी)
दक्षिण मुंबईत उभारणार शिवसेनाप्रमुखांचा पुतळा
By admin | Published: October 10, 2015 4:13 AM