- रवींद्र देशमुख
मुंबई - मागील अनेक वर्षांपासून जालनेकर भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेना उमेदवार अर्जुन खोतकर यांच्यातील मतभेद अनुभवत होते. परंतु, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून खोतकर आणि दानवे यांच्यात चांगलीच गट्टी जमली आहे. त्यामुळे जालन्यातून शिवसेनेला बळ मिळाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी खोतकर आणि दानवे यांच्यातील वितुष्ट विकोपाला गेले होते. त्यावेळी दानवे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेत दोघांची समेट घडवून आणली. त्यानंतर जालना मतदार संघातून दानवेंचा सहज विजय झाला. त्याची परतफेड म्हणून दानवे देखील खोतकरांसाठी जालन्यात ताकद लावताना दिसत आहेत.
2014 मध्ये खोतकर यांचा निसटता विजय झाला होता. त्यांच्या विजयाचा फरक 300 मतांहूनही कमी होता. यावेली मात्र खोतकर यांनी पूर्ण जोर लावला आहे. ऐनवेळी कोणतीही कसर राहायला नको, म्हणून दानवे देखील त्यांच्यासोबत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी भाजप-शिवसेनेत बंडखोरीचा बोलबाला असताना जालन्यात खोतकरांसाठी तरी याचे टेन्शन नाही.
खोतकर यांचा अर्ज दाखल करण्यापासूनच दानवे त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे दोघाच्या जमलेल्या गट्टीची चर्चा मतदार संघात सुरू आहे. अर्थात याचा लाभ खोतकरांना होईल, असंही अनेकाचे म्हणणे आहे. खोतकर यांच्या समोर जालन्यातून काँग्रेसचे उमेदवार कैलाश गोरंट्याल यांचे आव्हान आहे.