Tata Airbus Project: वेदांता- फॉक्सकॉनपाठोपाठ आता नागपुरात साकारण्याचा प्रस्ताव असलेला संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे. हा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये साकारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता. आता २२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरात राज्यातील बडोदा येथे उभारला जाईल. यावरून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण तापलेले पाहायला मिळत असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. राज्यातील प्रकल्प, उद्योग गुजरातला नेण्यासाठीच सत्तांतर झाले, असा आरोपही सुभाष देसाईंनी केला आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर येथील तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आणि एकाच राज्यात गेले आहेत. यावर शिंदे-फडणवीस सरकार ब्र देखील का काढत नाही, अशी विचारणा करत, भाजपच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारकडून राज्यातील उद्योग पळवापळवी करण्यासाठी मिंदे सरकार आले असल्याची घणाघाती टीका सुभाष देसाई यांनी यावेळी केली.
केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला समान न्याय दिला पाहिजे
टाटा-एअर बसचा प्रकल्प हा २२ हजार कोटींच्या प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असताना हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने प्रश्न निर्माण होत आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तीन मोठे प्रकल्प गेल्याने सरकारच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण होत आहे. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला समान न्याय दिला पाहिजे. मात्र, केंद्राकडून तसे होताना दिसत नसून एका राज्याला झुकत माप दिले जात आहे, असा आरोपही सुभाष देसाई यांनी केला.
दरम्यान, बेंगळुरूमध्ये हवाई उद्योगांशी संबंधित एक मोठे प्रदर्शन आयोजित केले जाते. त्या ठिकाणी टाटा आणि एअरबसच्या अधिकाऱ्यांसोबत प्रकल्पाबाबत चर्चा झाली. मनुष्यबळ, सवलती देण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर पुढे 'वर्षा' बंगल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, टाटा समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांच्यासोबत एक बैठक झाली. यामध्ये सेमीकंडक्टर, एअरबस आणि इतर प्रकल्पांबाबतही चर्चा झाली होती. त्याच्या पुढील टप्प्यात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीत मी स्वत: मंत्री आदित्य ठाकरे, टाटा समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांच्यासह संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रकल्पांच्या अनुषंगाने चर्चा होती, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"