मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याविषयी पत्र पाठवले आहे. विधीमंडळातील बहुमत चाचणी विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली भाजप श्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर रात्री मुंबईत राज्यपालांची त्यांनी भेट घेतली. राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, राज्यपालांच्या या आदेशाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे.
शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा आजचा नववा दिवस आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत जवळपास ४० हून अधिक आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. हे सर्व आमदार गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. त्यामुळे राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, शिवसेनेतील बंडखोर आमदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्या मुंबईत पोहोचणार असल्याची माहिती स्वत: एकनाथ शिंदे यांनी दिली. उद्या सर्व आमदारांना घेऊन मुंबईत येणार आणि बहुमत चाचणीसाठी हजर राहणार अशी माहिती त्यांनी दिली. एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी उद्या मुंबईत येण्याबाबत वक्तव्य केले.