Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. बंडखोरांना अद्दल घडवण्यासाठी काही मंडळींना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत प्रवेश देत शिवबंधन बांधले. यातील एक नाव म्हणजे शिवसेनेत प्रवेश करताच उपनेतेपद मिळालेल्या सुषमा अंधारे. शिवसेनेतील फायर ब्रँड नेत्या म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असून, बंडखोरांवर सातत्याने अंधारे तोफ डागत आहे. यातच शिंदे गटातील एक आमदार आमच्या संपर्कात असून, आम्ही परतीचे दोर कापलेले नाहीत, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.
सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणल्या की, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि आम्ही संयमित भाषेचा वापर करत आहोत. आम्ही टीका करताना कधीही पातळी सोडणार नाही. परतीचे दोर आमच्याकडून कापले गेले नाहीत, असे सूचक विधान सुषमा अंधारे यांनी केले. तसेच हिंदुत्वावर भूमिका स्पष्ट करताना, मला सर्व धर्माबाबत आदर आहे. स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमधील परिषदेत हिंदुत्व सांगितले ते महत्त्वाचे आहे, असे सुषमा अंधारे यांनी नमूद केले.
आमदार संजय शिरसाट हे शिंदे गटात अस्वस्थ
शिंदे गटात काही आमदार नाराज असून काहीजण संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिंदे गटात असलेले आमदार संजय शिरसाट आमच्या संपर्कात आहेत. आमदार संजय शिरसाट हे शिंदे गटात अस्वस्थ आहेत. संजय शिरसाट यांना पश्चाताप होतोय, असा मोठा दावा सुषमा अंधारे यांनी केला. तसेच बच्चू कडू हे लढाऊ आणि स्वाभिमानी आहेत. त्यांच्यावर आरोप होणे हे चुकीचे आहे. मात्र, रवी राणा हे उथळ व्यक्तिमत्त्वाचे असून, चर्चेत राहण्यासाठी ते सतत काहीतरी बोलत असतात, अशी बोचरी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
दरम्यान, ईडी, सीबीआयचा भाजपकडून दुरुपयोग सुरू आहे. भाजपमध्ये असलेल्या कोणत्याही भ्रष्टाचारी नेत्याविरोधात कारवाई केली जात नाही. कोरोना काळात जिल्ह्यात झालेल्या अपहाराबाबत कोणतीही कारवाई केली जात नाही. मागील काही दिवसात कुरघोडीचे राजकारण सुरू असून लोकांच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही, या शब्दांत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत, महापौर शिवसेनेच्या आहेत म्हणून महापालिकेचा निधी पालकमंत्री रोखत आहेत. त्यांना त्रास दिला जात आहे हे योग्य आहे का, अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"