Maharashtra Politics: नवीन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेसह महाविकास आघाडीचे नेते सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहेत. तर भाजपसह शिंदे गटही जोरदार पलटवार करत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना दिसत आहेत. यातच शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधत, धर्माच्या नावावर थयथयाट बंद करा, या शब्दांत हल्लाबोल केला आहे.
खासदार नवनीत राणा यांचा गणपती विसर्जन करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, या व्हिडिओत खासदार नवनीत राणा यांच्याकडून केल्या जाणाऱ्या विसर्जन पद्धतीवरून जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. याच मुद्द्यावरून आता सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा यांना चांगलेच सुनावले आहे. तुम्ही हनुमान चालिसेसाठी थयथयाट केलात. मात्र आपल्याला हनुमान चालिसा म्हणता येत नाही. हनुमानाला हनुमान का म्हणतात, याचेही नेमके कारण आपल्याला माहिती नाही, असे सांगत सुषमा अंधारे यांनी राणांवर हल्लाबोल केला.
धर्माच्या नावावर थयथयाट बंद करा
तुम्ही स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणून घेता पण तुम्हाला गणपती विसर्जनाची साधी पद्धत माहिती नाही, अशी विचारणा करत, धर्माच्या नावावर थयथयाट बंद करा. नवनीत राणा धर्माच्या नावावर वारंवार अवडंबर माजवत आहेत. त्यांना आरसा दाखवण्याची गरज असल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे. तसेच इतर धर्मियांकडून गणपती विसर्जनाची पद्धत चुकली असती तर नवनीत राणांनी कहर केला असता, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, आम्ही तुमच्यासारखे आक्रस्ताळेपणाने बोलत नाही याचा अर्थ आम्हाला धर्म कळत नाही असा होत नाही. धर्म हा माणसाच्या सौख्यासाठी, समृद्धीसाठी आणि मानसिक उमेद कायम करण्यासाठी असतो. धर्माच्या नावावर माणसाची कोंडी करुन त्याचे जगणे मुश्कील करण्यासाठी धर्म नसतो, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.