मुंबई - लढाई २ वाघांमध्ये असताना तिथे कुत्र्यांचा फायदा कशाला हे समजायला हवं असं सांगत शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना खोचक सल्ला दिला आहे. मुलुंड येथे झालेल्या महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारे यांनी २ वाघांची गोष्ट सांगितली. त्यात कुणाचेही नाव घेतले नाही. या वाघांमधील भांडणाचा कुत्र्यांना फायदा झाल्याचं म्हटलं. त्यामुळे हे २ वाघ म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अशी कुजबूज कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, २ वाघ होते, शहाणे होते. दोन्ही वाघांची प्रचंड दोस्ती होती. लहानपणापासून एकत्र होते. खेळायचे, खायचे, प्यायचे, बसायचे. सगळ्या गोष्टीत एकमेकांना छान साथ दिली. त्यानंतर कालांतराने त्या दोघांमध्ये वितुष्ट आले. भांडण झाले. अ आणि ब वाघ समजून घ्या. भांडण झाल्यानंतर एकेदिवशी ब वाघाने त्याच्या लेकराला सांगितले. अ वाघ कसा वाईट आहे, अ ने असं केले, तसे केले सांगितले. एकदा ब लेकराला शिकार शिकवायला गेला. तेव्हा अ वाघ रस्त्यावर बसलेला दिसला. ब खुश झाला. अ वाघ आजारी झाला होता. त्याचवेळी कुत्र्यांचा घोळका येत होता. तेव्हा ब नं इतर काही न बघता जोरात झेप घेतली कुत्र्यांवर तुटून पडला. दुसरा कसलाही विचार केला नाही असं त्यांनी सांगितले.
तर या प्रकारानंतर ब च्या लेकराने बापाला विचारलं, तुम्ही अ चा एवढा राग करता, आज चांगली संधी आली होती मग कशाला मदत करायला गेला? ब शहाणा वाघ होता, तो मिमिक्री आर्टिस्ट नव्हता. ब म्हणाला, काहीही झाले तरी लढाई २ वाघांमधील आहे. त्यात कुत्र्यांचा फायदा व्हायला नको. पण हे कळायला शहाणपण लागतं असं सांगत सुषमा अंधारेंनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर खोचक टीका केली.
राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेनेत शिंदे-ठाकरे गट असे गट निर्माण झाले. त्यात शिवसेनेच्या तब्बल ४० आमदार आणि १३ खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. या राजकीय वादंगात उद्धव ठाकरे एकाकी पडले असताना राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु राज ठाकरेंनी थेट भाजपा-शिंदे गटाशी जवळीक साधली. त्यामुळे शिवसेना उबाठा गट आणि मनसे यांच्यात आणखी दरी निर्माण झाली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"