Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. यातच मराठी मुस्लिम सेवा संघाने उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिल्यावरून भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली होती. या टीकेचा समाचार घेताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आशिष शेलार यांच्यावर पलटवार करताना, सरसंघचालक मशिदीमध्ये इस्लाम कबूल करायला गेले होते काय, अशी विचारणा केली आहे.
दैनिक सामना अग्रलेखावरून आशिष शेलार म्हणाले होते की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुस्लिम आणि मराठी मते हवी आहेत. राजकीय स्वार्थासाठी चतुराईने शब्दांचा खेळ केला गेला आहे. भाजप मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार आणि या तुष्टीकरणाच्या राजकारणाबद्दल जागरुकता निर्माण करेल, असा इशाराही आशिष शेलार यांनी दिला होता.
सरसंघचालक मशिदीमध्ये जातात तेव्हा तुम्ही का प्रश्न विचारत नाही?
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी आशिष शेलार यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही मराठी मुस्लिम असा उल्लेख केला आहे, त्यावरून आशिष शेलार यांनी भ्रम निर्माण केला आहे. सरसंघचालक मशिदीमध्ये जातात तेव्हा तुम्ही का प्रश्न विचारत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी चादर चढवायला का जातात, आशिष शेलारांनी हेही सांगावे, असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केला आहे.
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे प्रभारी चार्ज द्या
मिहानमध्ये होणारा प्रकल्पही राज्याबाहेर गेला. एकूण सात प्रकल्प राज्याबाहेर गेले. मुख्यमंत्र्यांना वेळ नाही ते सण-उत्सव साजरे करण्यात व्यस्त आहेत. तर उपमुख्यमंत्र्यांना कट कारस्थानाचे राजकारण करण्यापासून वेळ मिळत नाही. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे प्रभारी चार्ज द्या, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.
दरम्यान, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची एसआरए घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. यावर बोलताना, किशोरी पेडणेकर यांच्या बाबतीत द्वेषाचे राजकारण सुरू आहे. जे भाजपला जुमानत नाहीत, त्यांच्या बाबतीत असे राजकारण केले जात आहे, अशी घणाघाती टीकाही सुषमा अंधारे यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"