रत्नागिरी : कोळशावर विद्युत निर्मिती करणाऱ्या १८ उद्योजकांकडून शिवसेनेने जैतापूर प्रकल्पविरोधातील सुपारी घेतली आहे. त्यामुळेच त्यांचा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधात एककलमी कार्यक्रम सुरू आहे, असा घणाघाती आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. गेल्या आठ महिन्यांतील राज्य सरकारच्या सर्व आघाड्यांवरील अपयशाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हा कॉँग्रेसतर्फे रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व राणे यांनी केले. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्यासोबत कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले की, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे येथील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे; मात्र या प्रकल्पाच्या उभारणीमुळे कोळशावर विद्युत निर्मिती करणाऱ्या उद्योजकांची वीज विकली जाणार नाही. त्यामुळेच हा प्रकल्प होऊ नये म्हणून कोळशावरील विद्युत प्रकल्प असणाऱ्या १८ उद्योजकांनी जैतापूर प्रकल्पविरोधात सुपारी देऊन शिवसेनेला उभे केले आहे; मात्र हा प्रकल्प होणारच आहे. राज्य सरकारने अनेक चुकीच्या गोष्टी केल्या आहेत. सध्या बाजारात पंकजा चिक्की आली आहे; मात्र त्यात खिळे, तारा, दगड मिळतील या भीतीने त्या चिक्कीकडे लोकांनी दुर्लक्ष केले, अशी खिल्ली उडवीत राणे म्हणाले की, चिक्कीची आॅर्डर इ टेंडरिंगद्वारे द्या, असा उच्च न्यायालय, आयुक्त व राज्यपालांचा निर्देश असतानाही चिक्कीची आॅर्डर परस्पर दिली गेली. आपण मुख्यमंत्री असतानाचे काहीजण आज मंत्रिमंडळात आहेत. आज ते जनहितापेक्षा स्वार्थासाठी नको ते प्रकार करीत आहेत. जनतेला पारदर्शक कारभार हवा आहे. मंत्री, मुख्यमंत्रीही खोटे बोलतात. अन्य मंत्र्यांप्रमाणे मुख्यमंत्र्यांचे हातही भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत. जनतेच्या पैशातून मुख्यमंत्री फडणवीस आपल्या कुटुंबीयांसमवेत अमेरिका वारी करीत आहेत. जहाजावर रोमॅँटिक गाण्यावर थिरकत आहेत. राज्यात आजवरच्या मुख्यमंत्र्यांची देशात व परदेशातही नेहमीच चांगली प्रतिमा राहिली,. मात्र, रोमँटिक गाण्यावर नाच करीत फडणवीस यांनी जे काही केले, त्यामुळे राज्याची मान शरमेने झुकली आहे, असे राणे म्हणाले. (प्रतिनिधी)भ्रष्टाचाराच्या कुंडल्या विधानसभेत मांडणारराज्यातील फडणवीस सरकारने आठ महिन्यांतच भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. विधिमंडळ अधिवेशनात या सरकारला कोंडीत पकडणे हे आमचे विरोधीपक्ष म्हणून कामच आहे. त्यामुळे भाजप व सेनेच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या कुंडल्याच विधिमंडळात मांडल्या जातील. त्यांचा ‘अच्छे दिन आनेवाले है’, या भुलविणाऱ्या घोषणेमागील खरा चेहरा लोकांसमोर आणावयाचा आहे. आपण विधिमंडळाबाहेर असलो, तरी काँग्रेसचे आमदार या भ्रष्टाचाऱ्यांच्या कुंडल्या विधिमंडळात मांडून त्यांचा भ्रष्टाचार वेशीवर टांगतील, अशी व्यवस्था केली जाईल, असे राणे यांनी सांगितले. सरकार कधी कोसळेल हे पवार ठरवितातराज्यातील सरकार आठ महिन्यांत भ्रष्टाचारात रुतले आहे. कितीही घोटाळे झाले तरी पाच वर्षे हे सरकार रेटवून नेण्याचा कसाबसा प्रयत्न होईल. सरकार कधी कोसळावयाचे हे शरद पवार ठरवितात, असा चिमटाही राणे यांनी काढला.
१८ उद्योजकांकडून शिवसेनेने घेतली सुपारी : नारायण राणे
By admin | Published: July 10, 2015 10:44 PM