खाट का कुरकुरतेय? विधान परिषदेवरून शिवसेनेचा काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 09:49 AM2020-06-16T09:49:20+5:302020-06-16T10:18:37+5:30

काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे.

Shiv Sena targets Congress on balasaheb thorat, ashok chavan statement on Vidhan parishad seats | खाट का कुरकुरतेय? विधान परिषदेवरून शिवसेनेचा काँग्रेसवर निशाणा

खाट का कुरकुरतेय? विधान परिषदेवरून शिवसेनेचा काँग्रेसवर निशाणा

Next

मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 विधानपरिषद जागांवरून काँग्रेसचे नेते उघडपणे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी असल्याचे सांगत आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वाट पाहत असल्याचे सांगत आहेत. यावर शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून काँग्रेसवर निशाना साधण्यात आला आहे. यामध्ये काँग्रेसला थेट तुमची खाट का कुरकुरतेय असा सवाल विचारण्यात आला आहे. 


काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते व सत्ता कोणाला नको असे नव्हे, पण ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करू नये, असा इशारावजा सल्ला देण्यात आला आहे. 


उद्धव ठाकरे सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री झाले. सरकारने सहा महिन्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. सरकार तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन बनवले. त्या सरकारचे सुकाणू एकमताने उद्धव ठाकरे यांच्या हाती दिले. राज्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचाच निर्णय अंतिम राहील हे ठरले. स्वत: शरद पवार यांनी हे पथ्य पाळले आहे. काँग्रेस पक्षाचेही बरे सुरू आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठेवली पाहिजे, असा सल्ला देताना काँग्रेस पक्षाला टोला लगावला आहे.  

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे कुरकुरणेही तसे संयमी असते. घरात भावाभावांची भांडणे होतात. इथे तर तीन पक्षांचे सरकार आहे. थोडेफार कुरकुरणे होणारच. ‘मुख्यमंत्र्यांना भेटून काय ते बोलू,’ असे थोरातांनी सांगितले. अशोक चव्हानांनीही तीच री ओढली आहे. कुरकुरत्या खाटेवरचे दोन मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. दांडगा अनुभव असलेले नेते राष्ट्रवादीतही आहेत. तथापि कुरकुर व कुरबुर होताना दिसत नाही, असा टोला थोरात आणि चव्हानांना लगावला आहे. 


तसेच विधान परिषदेच्या जागांवरूनही काँग्रेसला शिवसेनेने सुनावले आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार जागा वाटप व्हायला हरकत नसल्याचे सांगत त्यांना विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्यासाठी शिवसेनेने एक कॅबिनेट मंत्रिपद काँग्रेसला दिले, याचीही आठवण करून देण्यात आली आहे. काँग्रेसला जागांच्या प्रमाणात खूप काही मिळाले. समान वाटप झाले असते तर एवढे मिळालेच नसते, असा टोला लगावतना मुख्यमंत्र्यांना त्या बदल्यात सहा महिन्यांत कोणाची खाट कुरकुरली असे झाले नाही. यामुळे पुन्हा पहाटे राजभवनाचे दरवाजे उघडले जातील अशा भ्रमात राहू नये, असा इशारा काँग्रेससह भाजपाला देण्यात आला आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

TikTok ची कंपनी भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत?; व्हिडीओ अ‍ॅप बंद करणार

"सुशांत कसा आहे?" मृत्यू सहन होईना; वहिनीने सोडला प्राण

भविष्यवाणी! भारतावर मोठे संकट; 4.4 डिग्रीने पारा चढणार

जग दुसऱ्या मोठ्या महामारीच्या उंबरठ्यावर; सिंहाच्या हाडांपासून औषध, मद्याची निर्मिती घातक

Web Title: Shiv Sena targets Congress on balasaheb thorat, ashok chavan statement on Vidhan parishad seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.