Maharashtra Politics: काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे यांच्या गटात सहभागी झाले होते. त्यानंतर आता पुन्हा शिंदे गट उद्धव ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत आहे. नाशिकमधील ठाकरे गटाची होणारी पडझड रोखण्यासाठी संजय राऊत २ दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यातच आता नाशिकचे ठाकरे गटाच्या ५० पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावर ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गद्दारी न करणारे निष्ठावंत आमच्यासोबत, जाणारे खोके आणि धोकेंमुळे गेले, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
जे निष्ठावंत आहेत, जे महाराष्ट्राशी गद्दारी करत नाहीत. महाराष्ट्राला पुढे नेण्याच्या आमच्या भूमिकेशी जे गद्दारी करत नाहीत, ते आमच्यासोबत सतत राहिलेले आहेत. ज्यांना जायचे असते, काहींना खोक्यांसाठी असेल, काहींना धोक्यांसाठी असेल, ते जातात, त्यांना पर्याय नसतो, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात कोरोनाची परिस्थिती कशा प्रकारे हाताळली गेली, राज्याचा विकास कसा झाला, शाश्वत विकास या राज्याचा झाला, चांगली गुंतवणूक या महाराष्ट्रात आली, या गोष्टी ज्यांना आवडत आहेत, ते आमच्यासोबत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
राज्यात राजकीय पातळी घसरत चालली आहे
राज्यात राजकीय पातळी घसरत चालली आहे. जीडीपी घसरायला केळ्याचे साल सहा महिन्यांपूर्वी टाकले कुणी, हे तुम्ही लक्षात घ्या. तसेच राज्यात नवीन गुंतवणूक येताना दिसत नाही. दावोस येथे गुंतवणूक आणण्यासाठी जाणार आहेत. मात्र, माझ्या माहितीप्रमाणे आधीच अनेक करार रोखून ठेवले आहेत, जेणेकरून दावोस येथे जाऊन आम्ही गुंतवणूक आणली हे त्यांना दाखवता येईल, असा मोठा दावा आदित्य ठाकरेंनी केला.
हे सरकार लवरच पडणार आहे
महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी कोणताही गुंतवणूकदार इच्छुक नाही. याचे कारण एक सीएम आणि दुसरे स्पेशल सीएम आहेत. याशिवाय राज्यातील वातावरण घाणेरडे झालेले आहे. कोणाच्याही मागे कोणतीही एजन्सी लावली जात आहे. राजकीय पातळी घसरत असताना, माझी इच्छा आहे की, सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला पुढे नेण्याचा विचार केला पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. लवकरच हे खोके अपात्र ठरणार आहे. हे सरकार लवरच पडणार आहे. यापुढे जे सरकार येईल, ते महाराष्ट्राच्या हिताचे असावे, हीच प्रार्थना आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"