Pune Bypoll Election 2023: राज्यातील राजकारण अनेकविध मुद्द्यांवरून तापल्याचे दिसत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत शिंदे गटाच्या बाजूने दिलेला निकाल, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेला दावा आणि कसबा आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा प्रचार यामुळे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटाने कंबर कसली आहे. राज्यातील दिग्गज नेते मंडळी या प्रचारात सहभागी होताना दिसत आहेत. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार दिला नसला तरी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रचारात सहभागी होताना दिसत आहेत. मात्र, यातच पक्षविरोधी काम केल्याने ठाकरे गटातील ८ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
ठाकरे गटातील ८ पदाधिकाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी
चिंचवडमध्ये तिरंगी लढत आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वपक्षीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली आहे. राहुल कलाटे या अपक्ष उमेदवाराचा प्रचार करत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत ठाकरे गटातील ८ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. महिला संघटिका अनिता तुतारे, शहर संघटिका रजनी वाघ, विभाग संघटिका शिल्पा आनपान, उपशहरप्रमुख नवनाथ तरस, विभागप्रमुख प्रशांत तरवटे, हनुमंत पिसाळ, पिंपरी विधानसभा समन्वयक गणेश आहेर आणि रवि घटकर हे पदाधिकारी पक्षादेशाविरोधात काम करत होते, असा ठपका ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून वरिष्ठ नेत्यांपासून ते तरुण नेत्यांपर्यंत सर्वच नेते या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. आमदार रोहित पवार, नाना पटोले, अजित पवार हे मैदानात उतरले आहेत. त्यासोबतच भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्यासाठी भाजपचे नेते जोमाने प्रचार यात्रेत उतरले आहेत. भाजपकडून पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण, गिरीश महाजन प्रचारासाठी तळ ठोकून आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"