Maharashtra Politics: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानांचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटताना दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शिंदे गटातील आमदारांनीही याविरोधात तीव्र प्रतिक्रिया देत निषेध नोंदवला आहे. मात्र, यातच आता राज्यपाल कोश्यारी जी विधाने करतात, ती दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर करतात, असा गंभीर आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याचा निषेध करताना मोठा आरोप केला आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या बोलण्यामागे भाजपचा हात आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी सातत्याने महापुरुषांविषयी आक्षेपार्ह विधाने करतात. महात्मा फुलेंविषयी, शिवरायांबद्दल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी जी आक्षेपार्ह विधाने करतात, ती दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर करतात, असा दावा दानवे यांनी केला आहे.
महाराष्ट्राचे पाणी पाजल्याशिवाय शांत बसणार नाही
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सातत्याने अशी गंभीर विधाने करतात. महाराष्ट्राचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना मी सांगू इच्छितो की, आम्ही त्यांना महाराष्ट्राचे पाणी पाजल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा देत, छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचे आदर्श आहेत. मागच्या पिढीचे, आताच्या पिढीचे आणि येण्याच्या कित्येक पिढ्यांसाठी त्यांचे कार्य कायम आदर्श राहील. त्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असणाऱ्या शिवरायांविषयी एकही वाईट शब्द खपवून घेणार नाही, असे दानवे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस म्हणतात की, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत शिवाजी महाराज हेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत असतील. पण त्याच वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराजांबद्दल केलेल्या निंदनीय विधानात त्यांना काहीही चुकीचे दिसत नाही, हे अतिशय धक्कादायक आणि घृणास्पद आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"