Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाला पुन्हा एकदा नवीन तारीख मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या याचिकांवर सुनावणी घेण्यात आली. यानंतर आता ही सुनावणी थेट फेब्रुवारी महिन्यात पुढे ढकलली आहे. मात्र, यातच ठाकरे गटातील आमदाराने भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपला वेगवेगळे पक्ष फोडण्याची सवय आहे. फोडा आणि राज्य करा हीच त्यांची नीती आहे, या शब्दांत भाजपवर निशाणा साधण्यात आला.
ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपला वेगवेगळे पक्ष फोडण्याची सवय आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर मध्य प्रदेशातही त्यांनी पक्ष फोडले. कर्नाटकातही पक्ष फोडले. स्वतःचा पक्ष वाढत नाही. तर, फोडा आणि राज्य करा. ही भारतीय जनता पक्षाची नीती राहिली आहे. सुरुवातीला भाजपने असे दाखवले की, आम्ही त्यातले नाहीत. पण, नंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मी याला फोन केला होता. वहिनीसाहेबांनीही सांगितले होते की, देवेंद्र फडणवीस हे रात्री वेषांतर करून जात होते. त्यामुळे पक्ष फोडण्यात भाजपचा सहभाग होता, हे स्पष्ट आहे, असे दानवे यांनी म्हटले आहे.
मुंबईचे काम उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात
मुंबईचा विकास शिवसेनेने साधला आहे. आधी मुंबई पाण्यात बुडत होती. आता ठाणे, नागपूर, पुण्याचीही तशीच परिस्थिती झाली. परंतु, मुंबई सुरक्षित राहिली. याचे कारण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिकेत झालेले काम आहे. मुंबईचे काम उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आतापर्यंत झालेले आहे. याला कुणी थांबवू शकत नाहीत. नवीन सरकार आले. तेव्हापासून मुंबई महापालिकेचा उपभोग घेणे सुरू आहे. अवाढव्य पद्धतीने खर्च करणे सुरू आहे, अशी टीका दानवे यांनी केली.
दरम्यान, अधिकाऱ्यांवर अन्याय करणे सुरू आहे. याचा धडा मुंबईकर जनता या गद्दारांना शिकवतील, असा दावा दानवे यांनी केला. दुसरीकडे, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने मुंबईत पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्याच्या गल्लीच्या बाहेर कोणी ओळखत होते का? त्यांना कधी कुणी मुंबईतील एखाद्या कार्यक्रमाला तरी बोलावल्याचे आठवते का? ते कधी प्रभावी नेते होते का? अशी विचारणा अरविंद सावंत यांनी केली आहे. त्यांना काय करायचे ते करू द्या. शिवसैनिक आमच्यासोबतच आहे, असा दावा अरविंद सावंत यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"