Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिब परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित साई रिसॉर्टवर हातोडा पडणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तूर्तास रिसॉर्टचे पाडकाम होणार नसल्याचे सांगितले जात आहे. याबाबत बोलताना अनिल परब यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेले दावे फेटाळून लावले आहेत. साई रिसॉर्ट माझ्या मालकीचे नाही. न्यायालयाने या प्रकरणात ‘जैसे थे’चे आदेश दिलेले आहेत, असे अनिल परब म्हणाले.
किरीट सोमय्या यांनी दापोली येथील साई रिसॉर्टच्या खरेदी विक्री व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलेला आहे. अनिल परब यांनी चार वर्षांपूर्वी जुलै २०१८मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकांसाठी दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये या रिसॉर्टचा उल्लेख केला होता. त्यासाठी वीजजोडणी अर्जही त्यांनी केला होता. तसेच, या रिसॉर्टसाठी घरपट्टीही भरण्यात आली होती, असा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे. या प्रकरणी अनिल परब यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. मात्र, रिसॉर्टशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा अनिल परब यांनी केला आहे.
मला त्रास देणे हाच किरीट सोमय्यांचा उद्देश
मला त्रास देणे, महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा खराब करणे, हाच किरीट सोमय्या यांचा उद्देश होता. सोमय्या यांनी माझ्यावर मुद्दामहून आरोप केले आहेत. साई रिसॉर्टच्या बाजूला आणखी एक रिसॉर्ट आहे. तो माणूस गरीब आहे. त्याचा तर काहीही संबंध नाही. साई रिसॉर्ट बांधण्यास सरकारनेच परवानगी दिली होती. सरकारने दिलेली परवानगी चुकीची असेल तर त्यात मालकाचा दोष किती आहे, हे तपासावे लागेल, असे अनिल परब यांनी सांगितले.
सोमय्यांनी शिंदे गटात गेलेल्या नेत्यांविरोधात बोलून दाखवावे
नारायण राणे यांच्या घरावरही कारवाई केली आहे. तिकडे सोमय्या हातोडा घेऊन जात नाहीत. ज्यांनी शिंदे गटात प्रवेश केला, त्यांच्याबाबत सोमय्या एकही शब्द बोलत नाहीत. त्यांच्याविरोधात बोलायची सोमय्या यांच्यात हिंमत आहे का? हिंमत असेल तर सोमय्या यांनी शिंदे गटात गेलेल्या नेत्यांविरोधात बोलून दाखवावे, असे आव्हान अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"