Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडीतील वाद शमताना दिसत नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्यपालांवर सडकून टीका झाली. राज्यपाल हटाव, अशी भूमिकाही घेण्यात आली. यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले असून, ठाकरे गटाने राज्यपालांना खोचक टोला लगावला आहे.
नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी राज्यपालांवर हल्लाबोल केला.
देर आये दुरुस्त आये! उशीरा सुचले शहाणपण
देर आये दुरुस्त आये! राज्यपालांनी घटनाबाह्य ज्या गोष्टी केल्या आहेत, त्याचे पापक्षालन राजीनाम्याने होणारे नाही. मात्र, हे उशीरा सुचले शहाणपण आहे. राज्यपालांनी अनेक घटनाबाह्य गोष्टी केल्या आहेत. त्यांनी ज्या मुख्यमंत्र्यांना शपथ दिली, ती कोणाच्या शिफारसीवरून दिली. हे आजपर्यंत महाराष्ट्राला कळलेले नाही. मूळात अशा परिस्थिती सर्वाधिक संख्या असेल्या पक्षाला सत्तास्थापन करण्यासाठी बोलावले जाते. त्यानंतर राजकीय पक्ष बैठक घेऊन नेता निवडतात. मात्र, अशी कोणतीही बैठक झाली, असा कोणताही नेता निवडला गेला नाही. तरी त्यांना कोणी सांगितले की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ द्यायची आहे? अशी विचारणा अरविंद सावंत यांनी केली.
दरम्यान, महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील, असे राज्यपाल कोश्यारींनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"