Maharashtra Politics:भास्कर जाधव यांना शिंदे गटात यायचे होते, त्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदेंना अनेकदा फोन केले होते. मात्र, गुवाहाटीत असलेल्या आमदारांनी यासाठी नकार दिला, असा दावा भाजपने केला. याला भास्कर जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यानंतर आताच्या घडीला पक्षासाठी आणीबाणी परिस्थिती आहे. आपल्या पक्षात कार्यकर्ते नाहीत तर सैनिक आहेत. गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसायचे नाही, असा निर्धार ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने संपूर्ण महाराष्ट्रात शिवगर्जना अभियान सुरू करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईत शिवसेनेचा मेळावा पार पडला. यामध्ये शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. गद्दार शिवसेनेतून गेल्यापासून शिवसेना एकरुप झाली आहे. ठाणे शहर आणि जिल्ह्यात लोक गद्दार जाण्याचीच वाट पहात होते. शिवसेना एकरुप झाल्यामुळे संपूर्ण राज्यात शिवसेनेच्या मेळाव्यांना रेकॉर्डब्रेक गर्दी होत आहे. शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा आणि मातोश्री कुणाची हे देशातील लहान मुलांना विचारले तरी त्याचे एकच उत्तर असेल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. हे वास्तव असताना निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण गद्दारांना देऊन टाकला, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.
गद्दार आणि त्यांच्या पाठीराख्यांची पळताभुई थोडी होणार
इतर राजकीय पक्षात कार्यकर्ते असतात, परंतु आपल्या पक्षात कार्यकर्ते नाहीत तर सैनिक आहेत. यापूर्वीही शिवसेनेने अनेक संकटे झेलली असल्याने लढाई आपल्याला नवीन नाही. आता परिस्थिती आणीबाणीची असल्याने लढण्यासाठी वेगळीच मजा आहे. त्यामुळे आता कोंढाणा सर केलेले नरवीर तानाजी मालुसरे आणि घोडखिंडीत शत्रूला रोखून धरणारे बाजीप्रभु देशपांडे, यांच्यासारखे जिंकेपर्यंत लढायचे आहे.गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसायचे नाही. आता गद्दार आणि त्यांच्या पाठीराख्यांची पळताभुई थोडी होणार आहे, असा दावा भास्कर जाधव यांनी केला.
दरम्यान, सैनिकांच्या डिक्शनरीत नॉ प्रोब्लेम शब्द नसतो जनता आपल्याला कार्यकर्ते नाही तर सैनिक म्हणून ओळखते. सैनिक जेंव्हा लढाईला निघतात, तेंव्हा त्यांना विचारले जाते एनी प्रॉब्लेम, सैनिकाचे उत्तर असते नो प्रॉब्लेम. शिवसैनिकांनाही त्यांच्या डिक्शनरीतून नो प्रॉब्लेम हा शब्द आता काढून टाकायचा आहे. आपल्याला जिंकण्यासाठी लढायचे आहे. आपल्यातून आता ४० गद्दार जरी गेले असले तरी त्यांच्या जागेवर आपल्याला १४० निष्ठावंत निवडून आणायचे आहेत, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"