Shiv Sena Thackeray Group News:शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष वाढताना दिसत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी केंद्र सरकार, भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सातत्याने जहरी टीका करताना पाहायला मिळत आहेत. यातच आगामी काळात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारतील आणि पंतप्रधाान मोदी यांना पाठिंबा देतील, असा दावा करण्यात आला होता. यावर ठाकरे गटातील नेत्यांनी भाष्य केले आहे.
अहंकारी उद्धव ठाकरे बेचैन झाले आहेत. मोदींना कधी भेटतो, त्यांची माफी कधी मागतो आणि कधी त्यांना पाठिंबा देतो असे उद्धव ठाकरेंचे झाले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर त्यांना पडला होता. आता मातोश्रीवर त्याचे चिंतन सुरु झाले आहे. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोकांच्या माध्यमांतून भाजपाशी संपर्क करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. उद्धव ठाकरे विधानसभेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील आणि महाविकास आघाडीलाही जय महाराष्ट्र करतील, असा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला होता. यावर चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे एकवचनी, भाजपासोबत जाणे शक्य नाही
आमदार रवी राणा यांना कुठून स्वप्न पडले? उद्धव ठाकरे हे एकवचनी आहेत. आधीच तुम्ही लोक उद्धव ठाकरेंना त्रास देत आहात. उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणे कदापि शक्य नाही, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच भाजपाकडून दबाव तंत्राचा वापर सुरू आहे. संपूर्ण देशात असेच सुरू आहे. भाजपामुळे कामगार, उद्योगपती, शेतकरी त्रस्त झाले आहेत. याचा फटका भाजपाला बसणार आहे, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अशोक चव्हाण यांचे भाजपामध्ये जाणे हे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा अपमान आहे. अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रवेश करायला हवा होता. प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रवेश करून हलकेपणा करून घेतला. भाजपा प्रवेश योग्य नव्हे तर चुकीचे केले, असे स्पष्ट मत खैरे यांनी मांडले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या अनेक वेळा वावड्या उठवल्या जात आहेत. हे काम भाजपा करत आहे. जयंत पाटील हे शरद पवारांना पुतण्यापेक्षा जवळचे आहेत. पुतण्याने धोका दिला. पण, जयंत पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्र सांभाळला. ते भाजपमध्ये जाणार नाहीत, असे खैरे म्हणाले.