Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करत, कोरोना काळात सगळा पैसा उद्धव ठाकरे यांच्या घरात गेला, असा गंभीर आरोप केला. याला आता ठाकरे गटातील नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच किरीट सोमय्यांनी शिवसेनेची सुपारी घेतली का? खोके नागपूरहून आले की दिल्लीवरुन? अशी विचारणा करण्यात आली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी किरीट सोमय्या केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी खैरे यांनी किरीट सोमय्यांवर जोरदार निशाणा साधला. किरीट सोमय्या सातत्याने शिवसैनिकांवर बोलतात. शिवसैनिक आता भडकले आहेत. विकासावर बोलावे. एमपीएससीची मुले रस्त्यावर उतरलेत, त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला देताना, किरीट सोमय्या यांना वेळ आल्यावर आम्ही शिवसैनिक काय आहेत हे दाखवू, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला.
एवढे खोके नागपूर आले का दिल्लीहून आले?
उद्धव ठाकरेंनी पैसे घेतले म्हणणारे किरीट सोमय्या मूर्ख आहेत. मग हे एवढे खोके कुणी दिले, हे त्यांना महिती आहे का? नागपूरहून आले का दिल्लीहून आले? त्याची माहिती काढावी, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर देण्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होतोय. मुंडे साहेबांमुळे महाराष्ट्रात भाजप मोठा झालाय. पण पक्षात राजकारण खूप आहे. सुनील शिंदे यांचे नक्कीच उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले असेल. त्यामुळेच त्यांनी हे वक्तव्य केले असेल. पंकजाताईंनी शिवसेनेत आले पाहिजे, अशी पुष्टी खैरे यांनी यावेळी बोलताना जोडली.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी अशा फोडाफोडीचे राजकारण करू नये. यातून कोणताही पक्ष मोठा होत नाही. जनाधारानेच खऱ्या अर्थाने पक्ष वाढतो, असा टोला खैरे यांनी विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात नाशिकमधून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत झालेल्या राजकीय कुरघोडीच्या संदर्भात लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"