Maharashtra Politics: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा विशेष पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर करण्यात आला. अखेर १०० दिवसांनी संजय राऊत आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले. यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून मोठा जल्लोष करण्यात आला. मात्र, यातच संजय राऊत यांची सुटका व्हावी, यासाठी शनिदेवाला साकडे घातले होते. पूजा केली. त्यामुळे आता संजय राऊतांनी कुटुंबासह शनि शिंगणापूरला येण्याचे कबुल केले आहे, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.
१०० दिवस संजय राऊत जेलमध्ये होते. मात्र तिथेही त्यांचे वाचन, लिखाण आणि चिंतन सुरु होते. आता ते बाहेर आले आहेत. संजय राऊत बाहेर येण्यासाठी विशेष पूजा केली होती. तसेच बाहेर आल्यानंतर कुटुंबासहित शनि शिंगणापूरला येऊ, असे राऊत यांनी कबुल केले होते. शनी हा देवांचा कायदामंत्री आणि गृहमंत्री आहे. त्यामुळे त्याला प्रार्थना केली होती, असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक असल्याचे संजय राऊतांनी दाखवून दिले
शिवसेनेचा एकनिष्ठ नेता कितीही दबाव आला तरी दबला नाही. ते बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक असल्याचे संजय राऊत यांनी दाखवून दिले. या ४० गद्दारांनी यातून उदाहरण घ्यावं, ज्यांनी दबाव टाकला ते आता उघडे पडले. हा सत्याचा विजय असून राऊतांना मिळालेला हा एकनिष्ठेचा जामीन असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संजय राऊत आणि प्रवीण राऊतांना बेकायदेशीरपणे अटक केली आहे. प्रवीण राऊतांना फक्त दिवाणी वादासाठी अटक करण्यात आली. संजय राऊतांना तर कोणत्याही कारणाशिवाय अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात म्हाडाची भूमिका सुरुवातीपासून संशयास्पद राहिली आहे. ईडीनेही हे त्यांच्या तक्रारीत मान्य केले आहे. तरीदेखील म्हाडाच्या एकाही अधिकाऱ्याला या प्रकरणात आरोपी करण्यात आलेले नाही. ठराविक लोकांनाच अटक करण्याची ईडीची वृत्तीच दिसून येते, या शब्दांत न्यायालयाने ईडीच्या कारवाईवर ताशेरे ओढले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"