Shiv Sena Thackeray Group Vs BJP: दिवाळी सगळ्यांची गोड असावी. दिवाळी सगळ्यांनाच आरोग्याची, भरभराटीची असावी. दिवाळीचा आनंद एकतर्फी नसावा. दिवाळीच्या उत्साहात सगळ्यांनीच सामील व्हावे. पंतप्रधान लष्करी रंगभूषेत सैन्यतळावर जातात, तसे एका दिवाळीत त्यांनी खऱ्याखुऱ्या शेतकऱ्याच्या बांधावर जावे व कृषीप्रधान भारताच्या राष्ट्रनिर्मात्याची दुःखद कहाणी समजून घ्यावी. असंख्य शेतकऱ्यांच्या घरांत साधी पणतीही पेटलेली नाही, या शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केंद्र सरकारवर टीका केली आहे.
पंतप्रधान मोदी हे लष्करी गणवेषात जवानांबरोबर दिवाळी साजरी करताना दिसले. हिमाचल प्रदेशातील लेपचा येथील लष्करी तळावर पंतप्रधान पोहोचले. त्यांनी जवानांसोबत फराळ केला व देशाला माहीत नसलेली वेगळीच माहिती दिली. राष्ट्रनिर्माणात सैन्याचे योगदान अमूल्य असल्याची माहिती मोदी यांनी दिली. सैन्य आहे म्हणून आपला देश सुरक्षित आहे हे कुणालाच माहीत नसेल. सैन्यतळावर जाऊन आपल्या पंतप्रधानांनी नवे काय सांगितले? असा सवाल ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केला आहे.
शेतकऱ्यांचेही योगदान तितकेच अमूल्य आहे
राष्ट्रनिर्माणात सैन्याइतकेच ‘बळी’चे म्हणजे शेतकऱ्यांचेही योगदान तितकेच अमूल्य आहे. ‘ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो’ असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात बळीराजाचा बळी देऊन राज्य चालवले जात आहे. निसर्ग झोडत आहे व राजा मारत आहे. अशा कोंडीत सापडलेला बळीराजा चांगल्या दिवसाच्या प्रतीक्षेत येणारा दिवस ढकलत आहे. जोपर्यंत बळीराजास सुखाचे दिवस येत नाहीत, तोपर्यंत दिवाळी आणि पाडवा खऱ्या अर्थाने तेजोमय होणार नाही, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यांचे मुख्यमंत्री ‘पाडव्या’स शुभेच्छा देतात व आपापल्या बंगल्यांच्या आवारात थाटात सण साजरे करतात. बळीराजा मात्र बांधावर विमनस्कपणे बसून नुकसान झालेल्या पिकाकडे पाहत असतो. सीमेवरील सैनिकाला राष्ट्रनिर्माणाचे योगदान म्हणून ‘पगार’, ‘पेन्शन’ मिळते. बलिदानानंतर त्यांच्या कुटुंबास पेन्शन मिळते, पण बळीराजा व त्याचे कुटुंब सदैव निराधार म्हणून जगते. बळीराजा व त्यांची पोरे शेवटी कंटाळून आत्महत्या करतात व त्यांच्या कुटुंबास नंतर जे भोग भोगावे लागतात ते भयंकर असतात. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने ही वेदना कुणीतरी मांडायला हवीच म्हणून ती मांडली, असे ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे.