Shiv Sena Thackeray Group NCC: न्यायाच्या बाबतीत समानता ठेवणे हासुद्धा समान नागरी कायदा आहे. विरोधी पक्षांतील लोकांना भ्रष्टाचारविरोधी कायद्याने अडकवायचे, पण स्वपक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना, मंत्र्यांना अभय द्यायचे, हा कोणता कायदा? ‘स्वतःचा तो बाब्या व दुसऱ्याचे ते कार्टे’ अशा प्रकारचा ‘दुहेरी’ कायदा सध्या देशात राबवला जात आहे व पंतप्रधान मोदी भोपाळात समान नागरी कायद्याचा गोपाळा करीत आहेत, पण त्यांचा समान नागरी कायदा म्हणजे एक प्रकारे हम करे सो समान कायदा असाच आहे. हे ढोंग आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
आधी भिवंडीत नगरसेवकांना अपात्र ठरविणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःसह ४० बेइमान आमदारांना स्वतःच अपात्र घोषित करून मोदी यांनी पुकारलेल्या समान नागरी कायद्याचा मान राखावा. अध्यक्ष महोदय, तुम्हाला हेच अपेक्षित आहे ना? असा सवाल ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केला आहे. पंतप्रधान मोदी एक बोलतात, पण त्यांचे अंधभक्त किंवा टाळकुटे नेमके वेगळे करतात. हे आता नित्याचेच झाले आहे. मोदी यांनी काल भोपाळ येथे देशाला प्रश्न केला, ‘एका घरात कधी दोन कायदे असतात का? अशी दुहेरी व्यवस्था देशात बरी नाही!’ मोदी यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. निवडणुका जवळ आल्याने मोदी यांनी अपेक्षेप्रमाणे समान नागरी कायद्याला हात घातला. एकाच देशात दोन कायदे असूच नयेत, पण ‘एक देश दोन कायदे’ हे मोदींच्याच राज्यात निर्माण झाले. म्हणजे एक देशाचा कायदा आणि दुसरा हम करे सो कायदा!, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.
बेइमानांना वाचविण्यासाठी ‘मोदी सरकार’ शर्थ करीत आहे
महाराष्ट्रात ४० आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांच्या बासनात गुंडाळून ठेवले आहे. शिवसेनेचा आदेश झुगारून मतदान करणाऱया मिंधे गटाच्या ४० आमदारांना घटनेच्या १० व्या शेड्युलप्रमाणे अपात्र ठरवावेच लागेल असे कायदा सांगतो, पण या बेइमानांना वाचविण्यासाठी ‘मोदी सरकार’ शर्थ करीत आहे. आता आपल्याच देशातला दुसरा कायदा पहा – भिवंडी महानगरपालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत ‘उठाव’ करून काँग्रेसचा पक्षादेश डावलून विरोधी कोणार्क आघाडीच्या उमेदवाराला मतदान करणाऱया काँग्रेसच्या १८ तत्कालीन नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. त्या नगरसेवकांवर सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदीही घातली. हे प्रकरण म्हणजे ‘एक देश दोन कायदे’ असेच नाही काय? अशी विचारणा ठाकरे गटाने केली.
दरम्यान, मोदी यांनी समान कायद्याचे जे तत्त्व किंवा प्रवचन सांगितले, त्याच्या नेमके विरुद्ध वर्तन शिंदे व त्यांचे ४० आमदार करीत आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी भिवंडीत जो आदर्श निर्माण केला, तीच भूमिका अध्यक्ष महोदय, तुम्हाला पुढे न्यायची आहे. हाच भिवंडी मार्ग तुम्हाला अनुसरायचा आहे. ‘एक देश दोन कायदे’ चालणार नाहीत. आता फक्त समान नागरी कायद्याचे पालन करायचे आहे. मुसलमानांच्या शरीयत कायद्यास विरोध करणे हाच काही समान नागरी कायद्याचा आधार नाही. कायदा, न्यायाच्या बाबतीत समानता ठेवणे हासुद्धा समान नागरी कायदा आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.