Maratha Reservation: मोदी हे विश्वगुरू आहेत. जागतिक प्रश्नांवर ते तोडगे काढतात. त्यामुळे संसदेचे विशेष सत्र बोलावून मराठा आरक्षणावर तोडगा काढणे त्यांना कठीण नाही. मिंधे–पवार मराठा आहेत. फडणवीस ब्राह्मण आहेत. येथे तुमच्या जाती–पोटजातीचा प्रश्न येतोच कोठे? सत्ता भोगताना, महाराष्ट्र ओरबाडताना ‘जाती’ आठवल्या नाहीत, मग आताच का आठवतात? बेकायदेशीर मुख्यमंत्री शिंदे यांना टिकवण्याचा तोडगा आहे, पण जरांगे–पाटील यांचे प्राण वाचविण्याचा तोडगा नागपूरच्या कोतवालाकडे नाही, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र होत असताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी समाज माध्यमांवर ‘मी पुन्हा येईन’चा व्हिडीओ टाकून खळबळ उडवली. उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे- पाटील यांच्या आंदोलनावरून लक्ष उडविण्याचा हा डाव असावा. फडणवीस आता सारवासारवी करतात की, पुन्हा येईनचा व्हिडीओ टाकून मी परत कशाला येऊ? फडणवीस यांचे विधान हास्यास्पद व राजकारण पोरकटपणाचे आहे, या शब्दांत ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून हल्लाबोल केला आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा सापडत नाही
राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न भडकला आहे व सरकार सैरभैर झाले आहे. आता गावागावांत साखळी उपोषणे सुरू झाली आहेत व राजकीय नेत्यांना गावबंदी करून रोष प्रकट केला जात आहे. राज्याच्या अनेक मंत्र्यांच्या कार्यक्रमांत गोंधळ घातला जात आहे. मंत्र्यांना कॉलर पकडून जाब विचारला जात आहे. आतापर्यंत चार जणांनी आत्महत्या केल्या, पण सरकारला मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा सापडत नाही. शिंदे यांना विधान परिषदेवर आणून मुख्यमंत्रीपदी टिकवले जाईल, पण अपात्र ठरणाऱ्या इतर मंत्री व आमदारांना कसे टिकवणार? फडणवीस शिंदे यांना टिकवणारा तोडगा देत आहेत, पण मराठा आंदोलनकर्त्यांचा जीव वाचविणारा तोडगा देत नाहीत, अशी टीका करण्यात आली आहे.
दरम्यान, सरकार मराठा आंदोलन व आरक्षणाच्या प्रश्नावर गंभीर नाही. सरकारला हे आंदोलन चिघळवून भडका उडालेला हवा आहे. सरकारला भीमा-कोरेगावप्रमाणे पेटवापेटवी व्हावी असे वाटते आहे. फडणवीस-मोदी-शहा हे अपात्रतेनंतरही शिंदे यांना ‘टिकविण्याचा’ तोडगा शोधून बसले, पण मराठय़ांच्या आरक्षणावर त्यांना तोडगा काढता येत नाही. फडणवीस यांनी मनोज जरांगे-पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना विमानात बसवून दिल्लीस न्यावे व मोदींच्या समोर बसवावे, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.