Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या बोकांडी शिंदे-फडणवीस सरकार बसल्यापासून महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रांत पीछेहाट होत आहे. त्यातही कायदा-सुव्यवस्था आणि महिला सुरक्षा तर या सरकारने पार वाऱ्यावरच सोडली आहे. असा एकही दिवस जात नाही की महिलेवर अत्याचार होत नाही, खुनी हल्ला किंवा खून होत नाही, विनयभंग होत नाही. मुंबईतील उपनगरी रेल्वेदेखील आता महिलांसाठी सुरक्षित राहिलेली नाही, या शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.
महिला सुरक्षेबाबत महाराष्ट्राचा एक लौकिक होता, दरारा होता. मात्र वर्षभरात हे चित्र पालटले आहे. हल्ले आणि अत्याचाराच्या सावटाखाली जगण्याची वेळ राज्यातील महिलांवर आली आहे. त्यांच्यासाठी ना मुंबईतील लोकल सुरक्षित राहिली आहे ना राज्यातील रस्ते. नराधमांच्या दहशतीचे ओझे मनावर ठेवून महिलांना घराबाहेर पाऊल टाकावे लागत आहे आणि सुखरूप घरी पोहोचल्यावर त्या आणि त्यांचे कुटुंबीय सुटकेचा निःश्वास टाकत आहेत. कायदा बेभरवशाचा आणि सुव्यवस्थेचे ‘घोडे’ वरातीमागून नाचल्यावर दुसरे काय होणार? सरकार वर्षपूर्तीचे ढोल पिटत आहे आणि राज्यातील महिला सुरक्षेसाठी आक्रोश करीत आहेत, असा घणाघात ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केला आहे.
महिलांना ‘टार्गेट’ करण्याची विकृती महाराष्ट्रात आताच का वाढीस लागली आहे?
लोकल प्रवास महिलांसाठी दहशतीचाच ठरत असेल तर या कारवायांचा उपयोग काय? तुम्ही जे कारवाईचे दंडुके आपटले त्याने साधे टेंगुळदेखील गुंड आणि नराधमांच्या डोक्यावर येत नसेल तर सुशासन वगैरेच्या गप्पा या सरकारने न मारलेल्याच बऱ्या. प्रश्न एवढाच आहे की ही विकृती आताच एवढी बेलगाम का होत चालली आहे? महिलांना ‘टार्गेट’ करण्याची विकृती महाराष्ट्रात आताच का वाढीस लागली आहे? महिला सुरक्षेबाबत राज्याची एवढी गंभीर अवस्था असताना उठताबसता विरोधकांना डोस पाजणारे राज्याचे गृहमंत्री काय किंवा सत्ता पक्षातील महिला आघाडी काय, तोंड उघडत नाहीत, अशी टीका करण्यात आली आहे.
महिलांवरील अत्याचार, हल्ले ‘गतिमान’ झाले आहेत असे लोकांनी समजायचे का?
महाराष्ट्रात ‘वेगवान’ आणि ‘गतिमान’ सरकार सत्तेत असल्याने महिलांवरील अत्याचार, हल्ले ‘गतिमान’ झाले आहेत असे लोकांनी समजायचे का? महिलांच्या सुरक्षेसंबंधी अनेक घोषणा आणि निर्णयांचे ढोल हे सरकार पिटत असते. सार्वजनिक ठिकाणी पोलीस गस्त घालणे, निर्जन ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसविणे, एकाकी महिलांना घरी नेण्याची व्यवस्था करणे, निर्भया पथक अशा सुरक्षा उपायांची आणि घोषणांची यादी मोठी आहे, पण महिलांवरील अन्याय, हल्ले, लैंगिक अत्याचार त्यापेक्षा जास्त वेगात आणि पटींत वाढत आहेत, त्याचे काय? निर्भया पथकासाठी घेतलेल्या पेट्रोलिंग गाड्या राजरोसपणे सरकारच्या मंत्र्यांच्या दिमतीला ठेवल्यावर दुसरे काय घडणार? महिला सुरक्षेबाबत हीच या सरकारची संवेदनशीलता समजायची काय? अशी विचारणा ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.