Shiv Sena Thackeray Group: पुतीन यांनाही धक्का दिला जाऊ शकतो व हुकूमशहाची घाबरगुंडी उडते हे वॅगनर बंडाच्या रूपाने जगाने पाहिले. कोणत्याही हुकूमशाहीला असा हादरा कधी ना कधी बसत असतो. पुतीन असो की मोदी, त्यांना बंडाचा सामना करावाच लागतो. हिंदुस्थानातील सत्ता ही अहिंसक ‘वॅगनर’ मार्गानेच उलथवली जाईल व तो मार्ग मतपेटीचा आहे. पाटण्यात मोदी यांच्या सत्तेस आव्हान देणारा लोकशाही संरक्षक ‘वॅगनर ग्रुप’ एकत्र आला. हा ग्रुप भाडोत्री नाही हे महत्त्वाचे. पुतीन यांच्याप्रमाणेच मोदी यांना जावे लागेल, पण लोकशाही मार्गाने. पाटण्यातील ‘वॅगनर ग्रुप’ने तोच इशारा दिला, असे शिवसेना ठाकरे गटाने म्हटले आहे.
पाटण्यात १७ प्रमुख राजकीय पक्षांची प्रदीर्घ बैठक झाली. यात पाच विद्यमान मुख्यमंत्री तितकेच माजी मुख्यमंत्री होते. भारतीय जनता पक्षाविरुद्ध एकास एक लढत देऊन २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या भाजपचा पराभव करण्याचे या बैठकीत ठरले. २०२४ ला काय निकाल ‘ईव्हीएम’ लावणार नाही, जनताच लावेल. ‘ईव्हीएम’चा घोटाळा झाल्याचा संशय आला तर मणिपूरसारखी परिस्थिती त्या वेळी देशात निर्माण होईल. इतका उद्रेक जनतेच्या मनात साचला आहे, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून दिला आहे.
हीच विरोधकांच्या एकीच्या वज्रमुठीची ताकद
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ‘नड्डा’ वगैरे लोक ‘अब की बार भाजप ४०० पार’ अशा गर्जना करीत होते. पाटण्याच्या फोटोसेशननंतर स्वतः अमित शहा म्हणतात की, आम्ही ३०० जागा जिंकू. म्हणजे विरोधकांच्या एका फोटो सेशननेच भाजपच्या १०० जागा कमी केल्या व हीच विरोधकांच्या एकीच्या वज्रमुठीची ताकद आहे, असा विश्वास ठाकरे गटाने व्यक्त केला आहे. मोदी, शहा यांनी विजयाचे ढोल वाजविण्यासाठी, मतदारांवर दबाव आणण्यासाठी भाडोत्री लोक मोठ्या प्रमाणात निर्माण केले. हे भाडोत्रीच त्यांच्यावर पहिला वार करतील. याचे प्रात्यक्षिक सध्या रशियात घडत आहे. पुतीन यांच्याप्रमाणेच मोदी-शहादेखील देशात हुकूमशाही, एकाधिकारशाही आणू पाहत आहेत. त्यासाठी त्यांनी सर्व सरकारी यंत्रणा ताब्यात घेतल्या. आपल्या आजूबाजूला भाडोत्री लोक उभे केले. त्या भाडोत्र्यांना देशाची संपत्ती विकली, असा घणाघात ठाकरे गटाने केला.
दरम्यान, भाजपने सत्ता टिकविण्यासाठी अनेक बाजारबुणगे म्हणजे मिंधे आपल्याभोवती रक्षक म्हणून उभे केले. उद्या हेच लोक सगळय़ात आधी मोदी-शहांच्या पाठीत वार करून रस्त्यावर उतरतील. मोदी बायडेन यांना भेटण्यासाठी वॉशिंग्टनला गेले. अत्यंत चुकीच्या इंग्रजीत भाषण करून त्यांनी स्वतःचे हसे करून घेतले. हा अट्टाहास फक्त न्यूनगंड असलेली व्यक्तीच करू शकते. ‘व्हाईट हाऊस’च्या पत्रकार परिषदेत देशातील लोकशाही, संविधान, अल्पसंख्याकांवरील हल्ले यावर विचारलेल्या एकाच प्रश्नाने मोदी यांच्या पायाखालची जमीन सरकली हे स्पष्ट दिसते, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.