Maharashtra Udyog Ratna To Ratan Tata: महाराष्ट्र सरकारने उद्योगपती रतन टाटा यांचा ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने गौरव केला. रतन टाटा म्हणतात की, व्यवसायाचा अर्थ नफा मिळवणे नव्हे, तर समाजाबद्दल असलेली आपली जबाबदारी समजून घेणे होय. ही बांधीलकी टाटा आजही जपत आहेत. त्यांना उद्योगात चोऱ्या करून नफा नकोय, पण त्यांना पुरस्कार देणाऱ्यांचे काय? त्यांचे हात चोऱ्या–लुटमारीत गुंतल्याने त्यांनी विश्वास नष्ट करून पक्षांतरे केली. अशा लोकांकडून श्री. रतन टाटांसारख्या विश्वासपात्र लोकांना पुरस्कार स्वीकारावा लागतो हे दुर्दैवच म्हणावे लागेल, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकारणातून विश्वास संपला आहे. राजकारण हे खोटेपणाच्या व अविश्वासाच्या पायावर उभे आहे. पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच रोज खोटे बोलत आहेत. अशा खोटेपणाच्या वातावरणात महाराष्ट्र सरकारने उद्योगपती रतन टाटा यांचा ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने गौरव केला. हा पुरस्कार मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रदान केला व देवेंद्र फडणवीस, अजित पवार वगैरे लोक त्या सोहळय़ास उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, टाटा म्हणजे ट्रस्ट. टाटा म्हणजे विश्वास. प्रश्न असा आहे की, अशा विश्वासपात्र व्यक्तीला पुरस्कार देणाऱ्यांनी ‘विश्वास’ शब्दाची हत्याच केली, या शब्दांत ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून हल्लाबोल केला आहे.
टाटांना पुरस्कार प्रदान करण्याची योग्यता खरोखरच आहे काय?
मग ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला त्यांची टाटांना पुरस्कार प्रदान करण्याची योग्यता खरोखरच आहे काय? टाटा यांचे राष्ट्र उभारणीत योगदान मोठे आहे. मिठापासून विमानांपर्यंतच्या उद्योगांत टाटा आहेत. टाटांनी महाराष्ट्रास कर्मभूमी मानले व उद्योगाचा विस्तार देशात केला, असे म्हणताना, टाटांच्या निष्ठा कधी बदलल्या नाहीत. मात्र देशाच्या राजकारणाची सध्या काय अवस्था आहे? आज राजकारण हा फसवाफसवीचा उद्योग बनला आहे. टाटांच्या उद्योगांवर कधी धाडी पडल्या नाहीत, पण टाटांना ज्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्या महानुभावांच्या उद्योगांवर धाडी पडत असल्याने विश्वासाची ऐशी की तैशी करून या सगळ्यांनी पक्षांतर केले व टाटांना पुरस्कार देण्यासाठी पुढे आले, असे टीकास्त्र ठाकरे गटाने सोडले आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या आर्थिक उलाढालीत टाटांचे योगदान मोलाचे आहे व कोणी दबाव आणला म्हणून टाटांनी त्यांचे उद्योग गुंडाळून गुजरातेत हलवले नाहीत. ‘उद्योगरत्न’ म्हणून टाटांचा गौरव करताना महाराष्ट्राच्या घसरत चाललेल्या औद्योगिक क्षेत्राची चिंता शिंदे-पवार-फडणवीस सरकारला आहे काय? महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या कमजोर, खिळखिळा करण्याचा उद्योग केंद्राने चालवला आहे. महाराष्ट्रातील अनेक उद्योग, आर्थिक उलाढालींची केंद्रे गुजरातेत खेचून नेली जात आहेत. महाराष्ट्राचे ग्रामीण अर्थकारण व सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे उपद्व्याप सुरू आहेत. महाराष्ट्राची लूट सुरू आहे व त्या लुटीस हातभार लावणाऱ्यांच्या हातून टाटांना उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आला. टाटा म्हणजे विश्वास हे सांगणाऱ्यांनी जनमानसातून विश्वास गमावला आहे. पवार, शिंदे, फडणवीस हे लोकांच्या विश्वासास पात्र राहिलेले नेतृत्व नाही. अविश्वासाचे जुगाड करून सत्तेवर आलेले हे त्रिकुट आहे. रतन टाटा हे जगाच्या खोट्या दिखाव्यांवर विश्वास ठेवत नाहीत. ते साधे राहतात. उच्च विचारांचे ते शालीन व्यक्तिमत्त्व आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.