Maharashtra Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका मोठ्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीचे नेते सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत आहेत. यातच यावरून ठाकरे गटाने भाजपवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे सामंजस्याची भूमिका घेत असतात. तुरुंगात टाकण्याचे षड्यंत्र भाजप करते, या शब्दांत ठाकरे गटाने पलटवार केला आहे.
ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली. अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. अशा प्रकारे तुरुंगात टाकण्याचे षड्यंत्र भाजप करते. पण उद्धव ठाकरे अतिशय सामंजस्याने काम करतात. ५० लोक निघून गेले मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी वजन वापरले नाही. ते त्यांचे वजन वापरू शकत होते. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपात तथ्य नाही. माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केलेले विधान योग्य आहे, अशी पुष्टी अंबादास दानवे यांनी जोडली.
तेव्हाच्या राज्य सरकारने असा कोणताही प्रयत्न केला नव्हता
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना विचारणा करण्यात आली. यावर, देवेंद्र फडणवीस नेमके काय बोलले हे मी ऐकलेले नाही. मात्र, त्यांनी जो आरोप केला आहे, तसा कोणताही प्रयत्न महाविकास आघाडीच्या काळात झाला नाही. फडणवीस हे त्यांना असलेल्या माहितीच्या आधारे बोलले असतील. मात्र, मला जी माहिती आहे, त्यानुसार तेव्हाच्या राज्य सरकारने असा कोणताही प्रयत्न केला नव्हता, असे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, उद्धवजींनीच माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले. माझे आजही त्यांच्याशी कोणतेही वैर नाही. मनात कोणतीही कटुता नाही. पण पाच वर्ष ज्यांच्यासोबत काम केले. त्यांनी माझा एक फोनही उचलला नाही. त्यांनी सौजन्य म्हणूनही माझ्याशी बोलणे योग्य समजले नाही. उलट गेल्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावर वेगवेगळ्या केसेस कशा टाकता येतील यासाठीचे प्रयत्न झाले. कुठल्याही परिस्थितीत याला अडकवा, आत टाका असे टार्गेटच तत्कालीन सीपी संजय पांडे यांना देण्यात आले होते, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"