Maharashtra Politics: ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष अधिकच तीव्र होताना पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिंदे गटाला चांगले यश मिळाले होते. यानंतर शिंदे गटातील इन्कमिंग वाढत चालल्याचे दिसत आहे. राज्यभरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा वाढत चालला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला शिंदे गटातील नेते, पदाधिकारी यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. यानंतर आता ठाण्याच्या गल्लीबाहेर तरी त्यांना कोणी विचारत होते का, असा बोचरा सवाल ठाकरे गटाकडून विचारण्यात आला आहे.
दुसरीकडे, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने मुंबईत पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्याच्या गल्लीच्या बाहेर कोणी ओळखत होते का? त्यांना कधी कुणी मुंबईतील एखाद्या कार्यक्रमाला तरी बोलावल्याचे आठवते का? ते कधी प्रभावी नेते होते का? अशी विचारणा अरविंद सावंत यांनी केली आहे. त्यांना काय करायचे ते करू द्या. शिवसैनिक आमच्यासोबतच आहे, असा दावा अरविंद सावंत यांनी केला.
मुख्यमंत्री म्हणून तुम्ही नाव घेता सगळीकडे
त्यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची काय तयारी करायची करू द्या. त्याने काय फरक पडत नाही. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही नाव घेता सगळीकडे. सध्या सरकारकडून मुद्दे भरकटवण्याचे काम सुरू आहे. रोज वर्तमानपत्रातून जाहिरात दिली जात आहे. मुंबईचे सुशोभिकरण करणार असल्याच्या वल्गना केल्या जात आहे. मूळात सुशोभिकरणाची संकल्पना आदित्य ठाकरे यांची होती. ही संकल्पना कृतीत येण्याच्या वेळी पाठित सुरा खुपसला गेला. आता त्याचे भांडवल केले जात आहे, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.
दरम्यान, कोणी आमदार, खासदार गेले म्हणजे शिवसेना खच्ची झाली हा भ्रम आहे. त्याचे उत्तर आज मोर्चातून मिळेल. शिवसेना ही शिवसैनिकांची आहे. शिवसैनिक जसा आहे तसा आहे. पालापाचोळा उडतो. हेमंत ऋतू आल्यावर. नवी पालवी फुटते. नवीन मुले आमच्याकडे येत आहेत, असे सावंत म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"