राहुल गांधींविरोधात रस्त्यावर उतरणारे ढोंगी; संजय राऊतांची भाजपा-मनसेवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 15:45 IST2022-11-18T15:37:39+5:302022-11-18T15:45:11+5:30
वीर सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी गेल्या ८ वर्षापासून आहे. मग पुरस्कार का देत नाही? असा सवाल संजय राऊतांनी विचारला.

राहुल गांधींविरोधात रस्त्यावर उतरणारे ढोंगी; संजय राऊतांची भाजपा-मनसेवर टीका
मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केल्यानं महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. सावरकर हे इंग्रजांना मदत करत होते. त्यांना ब्रिटीशांकडून पेन्शन मिळत होती असं राहुल गांधींनी म्हटलं. राहुल गांधींच्या या विधानावर भाजपा-मनसे आणि शिंदे गट आक्रमक होत रस्त्यावर उतरला. ठिकठिकाणी या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात आंदोलन सुरू केले असून आता या आंदोलनावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने पलटवार केला आहे. हे सगळे ढोंगी आहेत अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली.
खासदार संजय राऊत म्हणाले की, वीर सावरकर कधीही भाजपा आणि संघ परिवाराचे आदर्श नव्हते. हे सगळ्यांना माहिती आहे. गोळवलकर गुरुजींनी सावरकरांच्या भूमिकेवर सातत्याने टीका केली होती. पण आता राजकीय फायदे तोटे पाहून वीर सावरकर यांच्या संदर्भात रस्त्यावर उतरण्याचं काम सुरू आहे. वीर सावरकरांबाबत इतका मान सन्मान असता तर सरदार पटेल यांचा जो पुतळा उभारला तसा दिल्लीत सावरकरांचा पुतळा बनवला असता. इंडिया गेटसमोर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा आहे. आम्हाला आनंद आहे. तिथे सावरकरांचा पुतळा उभारला असता तर आज राहुल गांधींच्या विरोधात तुम्ही जे आंदोलन करताय त्याला नैतिक बळ प्राप्त झालं असतं असं त्यांनी सांगितले.
तसेच वीर सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी गेल्या ८ वर्षापासून आहे. मग पुरस्कार का देत नाही? आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पोलिसांना कारवाईचा अधिकार आहे. वीर सावरकर यांच्याबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेला राहुल गांधींचे हे विधान अजिबात मान्य नाही. भारत जोडो यात्रेचा हा अजेंडा नव्हता मग कशासाठी हा विषय घेतला माहिती नाही. आम्ही सावरकर भक्त आहोत आणि राहणार. शिवसेनेला सावरकरांबाबत अशी विधाने मान्य नाहीत असं संजय राऊतांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भारत जोडो यात्रेत सहभागी असलेले काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी बराच वेळ माझ्याशी फोनवरून चर्चा केली. काही विषयांवर नक्कीच मतभेद आहेत. त्याबाबत जी काही चर्चा झालीय याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माहिती दिलीय असंही संजय राऊत म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"