Maharashtra Politics: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते विविध यात्रा, सभा, दौरे या माध्यमातून पक्ष आणि संघटना एकसंध ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. एकीकडे आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद यात्रा काढत असून, दुसरीकडे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. मात्र, जळगावमधील त्यांच्या सभेला परवानगी नाकारली. यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आले असून, मला नजरकैदेत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण महाप्रबोधन यात्रा पूर्ण करुन दाखवणारच, असा एल्गार सुषमा अंधारे यांनी केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, गुलाबराव पाटील गृहमंत्रालयाच्या आशीर्वादाशिवाय हे कसे करतील? देवेंद्र फडणवीसांना या सगळ्याची कल्पना नसेल का? प्रकाश सुर्वे हातपाय तोडायची भाषा करतात, सदा सरवणकर हवेत गोळीबार करतात. संजय गायकवाड चुन चुन के मारेंगे म्हणतात, नारायण राणे एकेरीने भाष्य करतात, संतोष बांगरांनी पोलिसांना केलेली शिवीगाळ हे सगळे चिथावणीखोर नाही का? पण या सगळ्यापैकी एकावरही काहीच कारवाई केली जात नाही. सभेसाठी परवानगी नाकारणे हा केविलवाणा प्रकार होता, असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला.
मग हॉटेलमधूनच ऑनलाइन सभा घेतली
सभा नाकारण्याचे कारण शेवटपर्यंत कळले नाही. माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही किंवा कुणाचा तक्रार अर्जही आलेला नव्हता. फक्त मला नजरकैदेत ठेवण्याचा प्रकार झाला. सभेची वेळ संपेपर्यंत मी हॉटेलमधून बाहेर पडणार नाही याची काळजी घेण्यात आली. मी कदाचित जोरजबरदस्ती करून बाहेर पडण्याचाही प्रयत्न करू शकले असते. पण त्यामुळे भाजपला किंवा गुलाबराव पाटलांना जे अपेक्षित होते की यातून गोंधळ व्हावा, ते टाळायचं होते. मला त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकायचे नव्हते. मग हॉटेलमधूनच ऑनलाइन सभा घेतली, असा घटनाक्रम सुषमा अंधारे यांनी सांगितला.
महाप्रबोधन यात्रा पूर्ण करून दाखवेन
हा सगळा प्रयत्न केविलवाणा होता. कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा थांबतो ही खुळी कल्पना आहे. तुम्ही अशा प्रकारे आवाज दाबून ठेवू शकत नाही. असे सगळे करून घाबरेन, असे काही पुढे करणार नाही असं त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. बाई समजून हलक्यात घेऊन नका. मी लढणार आहे. महिला म्हणून अजिबात व्हिक्टिम कार्ड खेळणार नाही. मी महाप्रबोधन यात्रा पूर्ण करून दाखवणार आहे, असा थेट इशारा सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"