Maharashtra Politics: शिवसेनेला पडलेल्या मोठ्या खिंडारानंतर पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी, पुन्हा उभी करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे राज्यभर दौरा करत आहेत. आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद यात्रा सुरू आहे. आदित्य ठाकरेंसह शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे याही दौऱ्यावर असून, महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. या यात्रेदरम्यान सुषमा अंधारे या सातत्याने शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका करताना दिसत आहेत. महाप्रबोधन यात्रेमुळे जनमत हलले आहे. म्हणून शिंदे-भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाची राज्यभर महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. यानिमित्त सुषमा अंधारे विविध जिल्ह्यांमध्ये सभा घेत आहेत. जळगावात महाप्रबोधन यात्रेतील सुषमा अंधारेंच्या सभेला परवानगीही नाकारली गेली. यावरून राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा सुरू झाल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपावर निशाणा साधला आहे. माझ्या सभांसाठी रीतसर परवानगी घेतली होती. तर गुलाबराव पाटील पोलिसांना अशा पद्धतीच्या ऑर्डर देऊन मला ओलीस कसे ठेवू शकतात? आणि पोलिसही गुलाबराव पाटलांचे हस्तक बनून कसे काय काम करू शकतात, अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली.
...म्हणून शिंदे-भाजपच्या पायाखालची वाळू सरकली
देवेंद्र फडणवीस तुम्हीच बघा हे किती वाईट आहे की, आपल्या मंत्रिमंडळातील एक मंत्री जाहीरपणे म्हणतो, की बाई आहे म्हणून सोडून देतोय. माणूस असता तर दाखवून दिलं असतं. पण हे वाक्य देवेंद्र फडणवीसांना किंवा गृहमंत्रालयाला अजिबात चिथावणीखोर वाटत नाही. तीन दिवसांपूर्वी माझ्या जळगावच्या महाप्रबोधन दौऱ्यात ज्या सभा सुरू होत्या, त्यातील चार सभा अत्यंत उत्सफुर्त प्रतिसादात पार पडल्या. जेव्हा शिंदे गट आणि भाजपाच्या असं लक्षात आलं, की या सभांमुळे जनमत हलत आहे. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी मला मुक्ताईनगरची सभा घेण्यापासून मज्जाव केला, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.
...तर तुम्ही यावर चकार शब्द बोलणार नाहीत का?
देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री आहात. मला सांगा, एक महिलेला तिच्याविरोधात पोलिसात कुठलीही तक्रार नसताना, ९ तारखेपासून महाप्रबोधन यात्रेत एकही शब्द सुषमा अंधारेच्या तोंडातून आक्षेपार्ह निघालेला नसतानाही, जर केवळ आणि केवळ मंत्री महोदयाच्या म्हणण्यामध्ये येऊन जर पोलीस विभाग मला ओलीस ठेवत असेल, तर तुम्ही यावर चकार शब्द बोलणार नाहीत का, अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"