Sushma Andhare Vs Shiv Sena Shinde Group: देशभरात दिवाळीची धूम पाहायला मिळाली. देशभरात सर्वोच्च न्यायालय असो वा उच्च न्यायालय यांचे निर्देश धुडकावून जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दिवाळी पाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी कार्यक्रमांची रेलचेल असल्याचे पाहायला मिळाले. यात आता ठाण्यातील एका कार्यक्रमावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटावर खोचक शब्दांत टीका केली आहे.
‘सबसे कातील, गौतमी पाटील’चा नारा ठाण्यातही घुमला. दिवाळी पहाटच्या निमित्ताने गौतमी पाटीलचा प्रथमच ठाण्यात लावणीचा कार्यक्रम झाला. माजी महापौर आणि शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी या लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावरून शिवसेना शिंदे गटावर टीका केली जात आहे. सुषमा अंधारे यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
ही संस्कृती बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी शिकवली का?
दिवाळी पहाटच्या निमित्ताने मंगल स्वर कानावर पडावे, अशी परंपरा आहे. दिवाळी पहाटला मंगलगाणी असतात. ठाण्यात वाजवली ती दंगलगाणी होती. अशी दंगलगाणी पहाटे वाजवणे हे तुमच्या संस्कृतीत बसते का? ही संस्कृती शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी शिकवली का? ही संस्कृती महाराष्ट्रालाही मान्य आहे का, असे रोखठोक सवाल सुषमा अंधारे यांनी केले.
दरम्यान, गर्दी नळावर भांडण झाल्यावर सुद्धा जमते. मुद्दा दर्दी आणि गुणवत्ता असलेल्या लोकांच्या आहे. आधी गुणवत्ता स्थिर राखायला शिका. बाकी शिंदे गटाकडे अद्यापही वैचारिक आणि नैतिक अधिष्ठा नाही. हे पहाटे झालेल्या दंगल गाण्यांमुळे अजून स्पष्ट झाले, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.