Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्याच्या राजकारणात अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष तीव्र होताना दिसत असून, दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एक मोठा दावा केला आहे. ते मला थेट गोळी घालण्याऐवजी माझा अपघात घडवून आणू शकतात, असे खळबळजनक विधान सुषमा अंधारे यांनी केले आहे.
चंद्रपूर शहरातील प्रियदर्शिनी सभागृहात सुषमा अंधारे यांनी व्याख्यान देताना हे वक्तव्य केल्याचे सांगितले जात आहे. महापुरुषांच्या स्वप्नातील भारत या विषयावर सुषमा अंधारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सुषमा अंधारे यांनी भाजपा, मनसे आणि शिंदे गटातील नेत्यांना नेहमीच आपल्या भाषणातून निशाणा साधला आहे. तसेच शिंदे गटातील अनेक आमदारांच्या मतदारसंघात जाऊन सुषमा अंधारे यांनी बोचरी टीका केली आहे. यातच सुषमा अंधारे यांनी यावेळी बोलताना मोठाच दावा केला आहे.
ते मला थेट गोळी घालण्याऐवजी माझा अपघात घडवून आणू शकतात
माझ्याविरोधात तक्रारी दाखल होतील. आगामी काळात माझ्यावर काही संकटे येऊ शकतात. मात्र, मला त्याची पर्वा नाही. मला वाटते की माणसे जागी झाली पाहिजेत. काही लोक, अधिकारी मला सांगतात की, रात्रीचा प्रवास टाळा. घात-अपघात होऊ शकतो. आतापर्यंत अपघातात अनेकजण गेले आहेत. तुमच्यावर आरोप करण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. त्यामुळे ते तुम्हाला थेट गोळी घालण्याऐवजी तुमचा अपघात घडवून आणू शकतात. माझी प्रतिकात्मक तिरडी बांधू देत किंवा प्रत्यक्ष तिरडी बांधू देत, मी मात्र माझे काम प्रमाणिकपणे करण्याचे ठरवलेले आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सुषमा अंधारेंनी वारकरी संप्रदायातील काही कीर्तनकारांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्या चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या होत्या. त्यांच्या विधानांमुळे वारकरी संप्रदाय नाराज झाल्याचे बोलले जात होते. या नाराजीनंतर त्यांनी जाहीर माफीही मागितली होती. सुषमा अंधारेंनी केलेल्या काही विधानांमुळे वारकरी संप्रदाय आक्रमक झाला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"