Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्याच्या राजकारणात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देवीदेवतांबद्दल केलेल्या विधानामुळे अडचणीत सापडल्या आहेत. सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद घेत, वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये, माझी प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र सुरू असल्याची रोखठोक भूमिका सुषमा अंधारे यांनी मांडली.
महाराष्ट्राने अंधश्रद्धा निर्मुलन कायदा केला आहे. मी कुणाच्या श्रद्धेच्या आड नाही. माझी अंत्ययात्रा काढली गेली. खऱ्या वारकरी संप्रदायात अशी अंत्ययात्रा नसते. अंत्ययात्रेत भगवा फेटा घालून कुणी बसत नाही. भगवा रंग भागवत् धर्माची परंपरा आहे. त्याचा तो अवमान आहे. हे जे लोक भूंकतायेत त्यावर जास्त बोलू नये. अंत्ययात्रा ही भाजपाची स्टंटबाजी आहे. अल्पवयीन मुलांचा त्यात गैरवापर केला आहे. वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये, असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केला.
खासदार उदयनराजे राजीनामा देतील का?
यावेळी सुषमा अंधारे यांना पत्रकारांनी खासदार उदयनराजे भोसले राजीनामा देतील का, याबाबत प्रश्न विचारला. यावर, उदयनराजे नक्कीच राजीनामा देतील असे मला वाटतेय, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. त्यामुळे उदनराजे राजीनामा देणार की नाही? या चर्चांना उधाण आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याने त्यांच्याविरोधात उदयनराजेंनी रणशिंग फुंकले आहे. आधी रायगडावर आत्मक्लेश आंदोलन केल्यानंतर आता कोश्यारींविरोधात उदयनराजे आझाद मैदानात मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्यांकडून केली जात आहे. त्यात सुषमा अंधारे यांच्या एका विधानाची भर पडली आहे.
दरम्यान, गणेश शेटे तेच आहेत जे कोविड काळात २०१९ आणि २०२० ला मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हा उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागितला होता. तुषार भोसले आणि हा कंपू यांनी वारी बंद केल्यामुळे रान पेटवले होते. जे कधीच वारीत पायी चालली नाही. कोविड काळात लोकांचे आरोग्य न लक्षात केवळ राजकीय स्टंट केले. देहू आळंदीत ज्यांनी मोदींना पाचारण केले, तिथे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू दिले नव्हते. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"