Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांनी चांगलाच जोर धरल्याचे पाहायला मिळत आहे. सभा, मेळावे या ठिकाणी बॅनरबाजी आणि पोस्टरबाजीचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. यातच आता खासदार नवनीत राणा यांच्या पोस्टरबाजीवरून पुन्हा एकदा ठाकरे गट आणि राणा दाम्पत्य यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा यांच्या पोस्टरबाजीवरून पलटवार केला आहे.
खासदार नवनीत राणा यांच्या समर्थकांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवर नवनीत राणा यांचा ‘हिंदू शेरणी’ असा उल्लेख करण्यात आला आहे. ‘जो प्रभू श्रीराम का नही, वो किसी काम का नही’, असे बॅनरवर लिहिण्यात आले आहे. या बॅनरच्या माध्यमातून नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा लगावला आहे. उद्धव ठाकरे सरकारने हनुमान चालीसा पठणाला विरोध केला. हनुमान चालीसा वाचल्याबद्दल खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आणि १४ दिवस जेलमध्ये ठेवले, असेही या बॅनरवर म्हटले आहे.
नवनीत राणांनी पोस्टरबाजीत वेळ घालवण्यापेक्षा मतदारसंघात लक्ष द्यावे
यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देताना नवनीत राणा यांना प्रत्युत्तर दिले आहे. नवनीत राणा यांनी पोस्टर बाजी मध्ये वेळ घालवण्यापेक्षा अमरावतीमध्ये १७६ बालके महिला रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नाही म्हणून दगावली आहेत. याला कोण कारणीभूत या सर्वजणावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. मेळघाटची कुपोषित म्हणून ओळख आहे. तर त्याच विचारधारेच्या सरकार असलेल्या उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे अशाच पद्धतीने ६९ बालके दगावत असतील तर त्यांनी विचार करायला हवा, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
दरम्यान, रामनवमी जोरात साजरी करा, असे आदेश देऊन राज ठाकरे परदेशात गेल्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारेंनी खोचक टोला लगावला. याला आमच्या भाषेत उंटावरून शेळ्या हाकने बोलतात, अश्या लोकांचे जे दुटप्पी चेहरे आहेत ते यावेळेस उघडकीस पडतात, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावर निशाणा साधला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"