Maharashtra Politics: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांकडून करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधानांवरून विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळख असलेल्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून राज्यातील अनेक ठिकाणे पिंजून काढत आहेत. सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा उधळून लावू, असा इशारा मनसे नेत्याने दिला होता. याला सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर देताना मनसे नेत्यांना जाहीर आव्हान दिले आहे.
सुषमा अंधारे यांनी मुंबईतील एका जाहीर सभेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे. त्याचा उठ दुपारी आणि घे सुपारी… असाच कार्यक्रम असतो. ते अचानक गुहेतून बाहेर येतात. अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात. परत ते पुढच्या निवडणुकीलाच येतात, अशी बोचरी टीका सुषमा अंधारे यांनी केली होती. यानंतर मनसे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. यावर सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे.
…तर मनसे नेत्यांच्या शिष्यत्वाचा गंडा बांधायला तयार
मनसेच्या टीकेवर मी केवळ हसू शकते. ‘अपना एक स्टाईल हैं, इलाका तुम्हारा और धमाका हमारा’. मी पाठीमागे अजिबात बोलत नाही. मी जे बोलते ते अत्यंत वस्तुस्थिती आणि सत्य ते बोलत आहे. आजारपणाची टिंगल करणे हे कुठल्याही सुसंस्कृत, सभ्य, संवेदनशील माणसाला रुचणारे नाही. असे असले तरी मी मुलुंडच्या सभेत मांडलेले मुद्दे गैरलागू आहेत असे कोणाला वाटत असेल, तर माझी चर्चा करण्याची तयारी आहे. त्यांनी खुल्या सभेत चर्चेला उभे राहावे आणि ते जे बोलले ते मांडणं किती महाराष्ट्राच्या हिताचे होते हे सांगावे. माझी त्यावर बोलण्याची तयारी आहे. ते मला त्यांचा मुद्दा पटवून देऊ शकले तर मी त्यांच्या शिष्यत्वाचा गंडा बांधायला तयार आहे, असे आव्हान सुषमा अंधारे यांनी दिले.
दरम्यान, असे असले तरी ते मुद्द्यांची भाषा गुद्द्यांवर नेणार असतील तर शिवसेनेला गुद्द्यांची भाषा कुणीही शिकवण्याची गरज नाही. राडा संस्कृतीचा एनसायक्लोपिडिया शिवसेनेने लिहिला आहे, असा सूचक इशाराही सुषमा अंधारे यांनी दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"