“अजित पवारांना राजकीय डेंग्यू, देवेंद्र फडणवीसांनी तत्काळ राजीनामा द्यावा”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 01:56 PM2023-10-31T13:56:24+5:302023-10-31T14:00:39+5:30
Sanjay Raut News: एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्री म्हणून तेवढा अवाका नाही. दोन उपमुख्यमंत्र्यांनी काढता पाय घेतला आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
Sanjay Raut News: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आतापर्यंत शातंतेत सुरू असलेल्या आंदोलनाला जाळपोळ व तोडफोडीच्या घटनांमुळे हिंसक वळण लागले. जाळपोळीच्या घटनांनंतर अनेक नेत्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा भडका उडालेला असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्तीसगड येथे प्रचारात व्यस्त होते. तर अजित पवार यांना डेंग्यू झाल्याची माहिती आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली असून, देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीस स्वत:ला जबाबदार आणि कर्तबगार समजतात. राज्यांची खडा न् खडा माहिती आहे. राज्य पेटलेले असताना ते राज्यात नाही. देवेंद्र फडणवीसांकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी आहे. गृहमंत्रीपदाची जबाबदारी असलेला नेता राज्य सोडून कसे जाऊ शकतो? राज्य नुसते पेटलेले नाही तर लोकप्रतिनिधींची घरे पेटवली जात आहेत. नेत्यांना गावबंदी केली आहे. लोकांना गावात येऊ दिले जात नाही. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण चिघळत चालले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. या आंदोलकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली पाहिजे. गावबंदी सुरूच राहील. गृहमंत्री ज्या पद्धतीने बेदरकारपणे वागत आहेत, त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
अजित पवारांना राजकीय डेंग्यू झाला आहे
दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना राजकीय डेंग्यू झाला आहे. ते या प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना कोणता मच्छर चावला आणि डेंग्यू झाला हा तपासाचा भाग आहे. मोक्याच्या क्षणी त्यांना मच्छर चावला आणि डेंग्यू झाला, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. कायद्याचे राज्य केवळ विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी आहे का? खोटे खटले दाखल करणे हे कायद्याचे राज्य? हे काय सरकार आहे का? सरकारच अस्तित्वात नाही. सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. हे बेकायदेशीर सरकार आहे. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून तेवढा अवाका नाही. दोन उपमुख्यमंत्र्यांनी काढता पाय घेतला आहे. अशा त्रिकोणात हे राज्य सापडलं आहे, अशी चौफेर टीका संजय राऊत यांनी केली.
दरम्यान, आमदार अपात्रता सुनावणीवर भाष्य करताना, मूळात राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवले पाहिजे. ते या पदासाठीच अपात्र आहेत. ज्या पद्धतीने ते चालढकल करत आहेत, ज्या पद्धतीने ते सर्वोच्च न्यायालयाला, संविधानाला मानत नाहीत, अशी व्यक्ती कोणत्याही घटनात्मक पदावर असेल तर ती अपात्रच आहे. आधी त्यांना अपात्र केले पाहिजे. मग इतर आमदारांना अपात्र केले पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.