Sanjay Raut Vs PM Modi Govt: ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर मणिपूर सरकारने इंटरनेटवरील बंदी पुन्हा एकदा वाढवली आहे. मणिपूरमध्ये इंटरनेट सेवेवरील बंदी आता १० जुलै रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी इंटरनेट सेवा बंदी पाच दिवसांनी वाढवण्यात आली आहे. मणिपूरमध्ये ०३ मे रोजी संघर्ष सुरू झाल्यानंतर इंटरनेटवर बंदी घालण्यात आली होती. मणिपूर हिंसाचारावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समुदायांमधील संघर्षात जवळपास १२० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात काँग्रेस मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर सरकारकडे स्पष्ट उत्तर आणि जबाबदारीची मागणी करणार आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला भेट देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक बोलावावी, असेही काँग्रेसने म्हटले आहे. यानंतर आता संजय राऊतांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
पाकला उठसूठ दम देता, एकदा चीनला दम देऊन दाखवा
मणिपूरची स्थिती खूपच गंभीर होत चालली आहे. केंद्र सरकार मणिपूरकडे बघायलाही तयार नाही. विरोधी पक्ष फोडण्यात, २०२४ च्या निवडणुकीत, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात सरकार व्यस्त आहेत. पण मणिपूर जळत आहे, लोक मारले जात आहेत. पण नरेंद्र मोदी बोलत नाही. इंटरनेट तोडले म्हणजे मणिपूरला देशाशी तोडले जात आहे. हे जाणीवपूर्वक केले जात आहे. तिथून लक्ष हटवण्याकरता हा पक्ष तोडा तो पक्ष तोडा हे सुरू आहे. पंतप्रधानांना इतर राजकीय पक्ष तोडायला वेळ आहे. निवडणुकांचे बिगूल वाजवायला वेळ आहे. संघटनात्मक बदल करायला वेळ आहे. पण मणिपूरविषयी एक शब्द बोलायला तयार नाहीत, या शब्दांत संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच मणिपूरमध्ये चीनचे अतिरेकी घुसले आहेत, असा दावा करत, पाकिस्तानला उठसूठ दम देताय, एकदा चीनला दम देऊन दाखवा, असे आव्हान संजय राऊतांनी दिले आहे.
दरम्यान, पंतप्रधानांनी भारतीय फुटबॉल संघाच्या शानदार विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी वेळ काढला, याबद्दल आम्हा सर्वांना अभिमान वाटला, पण मणिपूरच्या मुद्द्यावर त्यांनी मौन बाळगले आहे. मणिपूरचे तीन फुटबॉलपटू या संघाचा भाग आहेत आणि पंतप्रधानांचे मौन त्या सर्वांना दुखावते, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे.