“विरोधी पक्षनेतेपदावर अजित पवार उत्तम काम करत आहेत, परंतु...”; संजय राऊत स्पष्टच बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 12:11 PM2023-06-22T12:11:37+5:302023-06-22T12:16:05+5:30
Sanjay Raut News: अजित पवार महाविकास आघाडीतले अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Sanjay Raut News: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्यासमोरच मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असे विधान केले. यावरून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
मीडियाशी बोलताना संजय राऊत यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. सुरुवातीला संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, पुन्हा प्रश्न विचारण्यात आल्यावर संजय राऊत म्हणाले की, तो त्यांच्या पक्षाचा मेळावा आहे. ही त्यांची अंतर्गत बाब आहे. विरोधी पक्षनेतेपदी कोणाला नेमायचे हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. यावर काँग्रेस काय म्हणते आहे, आम्ही काय म्हणतो आहे, हे प्रश्न विचारून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, या शब्दांत संजय राऊत यांनी सुनावले.
विरोधी पक्षनेतेपदावर अजित पवार उत्तम काम करत आहेत
विरोधी पक्षनेतेपदावर अजित पवार उत्तम काम करत आहेत. तसेच त्यांनी पक्षाच्या मेळाव्यात जे वक्तव्य केले त्यावर इतरांनी काही बोलू नये. अजित पवार त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांचा पक्ष त्यावर निर्णय घेईल, शरद पवार असतील तसेच त्यांच्या पक्षाची कार्यकारिणी असेल तर ती हे सगळे ठरवेल. पवारसाहेब अद्याप यावर काही बोलले नसतील तर आम्ही काय बोलायचे. अजित पवार विरोधी पक्षनेते पदावर राहणे महत्त्वाचे आहे. ते महाविकास आघाडीतले अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. हा महाविकास आघाडीतला महत्त्वाचा चेहरा आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केले आहे, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, मी इतके वर्ष विविध पदांवर काम केले. एक वर्ष मी विरोधी पक्षनेतेपद सांभाळलेले आहे. ते सांभाळत असताना काहीचे म्हणणे आहे तू कडक वागत नाही. आता म्हटले त्यांची गचांडी धरू की काय? संघटनेची जबाबदारी द्या आणि पक्ष कशा पद्धतीने चालवतो ते बघा. मला विरोधी पक्षनेतेपदात विशेष रस नव्हता. मात्र, आमदारांचा आग्रह आणि वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यामुळे मी ते पद स्वीकारले. पण आता बस झाले, मला त्यातून मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या, असे बोलत थेट विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करण्याची मागणी अजित पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना केली.