“शरद पवारांनी उत्तर द्यावे, दोन दगडांवर पाय असे...”; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 03:52 PM2023-08-25T15:52:58+5:302023-08-25T15:55:22+5:30
Maharashtra Politics: अजितदादांवरील विधानाने शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते का, असा सवाल संजय राऊतांना करण्यात आला होता.
Maharashtra Politics: अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवारांची मनधरणी करण्यासाठी अजित पवार गटाकडून अनेकदा प्रयत्न करण्यात आले. मात्र, शरद पवार भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले जाते. यातच आता शरद पवार यांनी अजितदादांबद्दल केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. सुप्रिया सुळेंनी केलेल्या विधानाला शरद पवारांनी समर्थन दिल्याचे दिसत आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.
अजित पवार हे आमचेचे नेते आहेत, राष्ट्रवादीत फुट नसल्याचे शरद पवार यांनी सांगत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. फूट पडली याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी येते, जेव्हा पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला देशपातळीवर, अशी स्थिती इकडे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आणि तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. जो त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच फूट म्हणायचे काही कारण नाही तो त्यांचा निर्णय आहे, असे शरद पवार यांनी म्हटले. यावरून आता संमिश्र प्रतिक्रिया येत असून, संजय राऊतांनी मीडियाशी बोलताना सडेतोड भूमिका मांडली आहे.
शरद पवारांनी उत्तर द्यावे, दोन दगडांवर पाय असे...
शरद पवारांच्या अजित पवारांबद्दलच्या वक्तव्यामुळे विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे का, असा प्रश्न संजय राऊतांना करण्यात आला होता. यावर, शरद पवार यांनी उत्तर द्यायचे आहे. त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी उत्तर द्यायचे आहे. मी माझी भूमिका, आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीमध्ये अजित पवार नाहीत, केवळ शरद पवार आहेत. भाजपबरोबर गेलेल्यांना, हुकूमशाही प्रवृत्तीबरोबर हातमिळवणी करणाऱ्यांना, अशा कोणत्याही नेत्याला किंवा पक्षाला महाविकास आघाडीत स्थान नाही. ईडीला घाबरून ज्यांना जायचे आहे ते जाऊ शकतात. मग ते आमच्याकडून गेलेले असतील अथवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेलेले असतील, तो निर्णय त्यांचा आहे. जसे शरद पवार म्हणाले, ही लोकशाही आहे, त्यामुळे तो निर्णय त्यांचा असेल. परंतु, आमचे महाविकास आघाडीचे काही निर्णय आहेत. दोन दगडांवर किंवा तीन दगडांवर पाय असे कोणाचे राजकारण असेल तर त्यासंदर्भात जनता निर्णय घेईल, असे संजय राऊत म्हणालेत.
दरम्यान, निवडणूक आयोगासाठी तसेच पक्ष, पक्षाची घटना आणि नेतृत्व वाचवण्यासाठी शरद पवारांनी वक्तव्य केले असावे. शरद पवार यांच्या विधानामुळे नेतृत्वात नाही, पण कार्यकर्ते आणि जनतेत संभ्रम होत असतो. हे सत्य आहे. ते नाकारता येत नाही. शरद पवार यांच्या विधानाने संभ्रम निर्माण होतोय. आमच्यामध्ये, शिवसेनेत संभ्रम निर्माण होतो. शरद पवारांच्या वक्तव्याचा इंडिया आघाडीवर परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली.