Maharashtra Politics: एकीकडे शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष वाढताना दिसत असून, दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्यासंदर्भात नवनवीत तारखा महाविकास आघाडीकडून देण्यात येत आहेत. तसेच राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्यासंदर्भात महाविकास आघाडीतच मतभेद असल्याचे दिसून येत आहे. कारण संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मध्यावधी निवडणुका लागण्याचा केलेला दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी फेटाळून लावला आहे. यातच आता ठाकरे गट मध्यावधी निवडणुका लागण्याबाबत ठाम असून, याचा आधारही देण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी पुढील ६ महिन्यांत १०० टक्के मध्यावधी निवडणुका लागणार आहेत. शिंदे-भाजप सरकार कोसळणार आहे, असे ठामपणे सांगितले आहे. शिंदे सरकार वैध आहे की अवैध यासंबंधीची केस सुप्रीम कोर्टात सुरु आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते, कितीही विलंब केला तरी पुढील सहा महिन्यात हा निकाल लागणार आहे. त्यानंतर हे सरकार कोसळेल. तसेच कदाचित राष्ट्रपती राजवट लागेल आणि महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील, असा दावा राऊत यांनी केला.
दोन दिवसांपूर्वीची गद्दारी अपेक्षित होती
महाविकास आघाडीतील १३ ते १४ आमदार शिंदे गट आणि भाजपच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात आहे. यावर बोलताना, स्वप्न पहातच बसावी त्यांनी. शेवटची गद्दारी दोन दिवसांपूर्वी झाली. ती आम्हाला अपेक्षित होती. त्यामुळे त्या गद्दारीचे फार मोठे वैषम्य वाटले नाही. बेईमानी करून त्यांनी ते थांबले नाहीत. शिवसेनेच्या अस्तित्वाला हात घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे शिवसैनिक पेटून उठले आहेत. ते धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा विनायक राऊतांनी दिला.
दरम्यान, शिंदे गटातील काही नेते पुन्हा ठाकरे गटात येण्याच्या विचारात आहेत, या चर्चांवर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, शिंदे गटातल्या लोकांना पुन्हा प्रामाणिक आणि सच्च्या कार्यकर्त्यांच्या घरात घ्यावं कुणालाच वाटत नाही. आमच्या संपर्कात नसले तरी एकमेकांच्या मानेवर बसत आहेत. तात्पुरते गळ्यात गळे घातलेत पण आता गळे ओरबाडण्याचा प्रयत्न सुरु झाला, अशी टीका राऊतांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"