Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. यावरून आता महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून, शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करत आहेत. यातच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना केतकी चितळेवर बोचरी टीका केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, जितेंद्र आव्हाड यांनी राजीनाम्याचा निर्णय घेऊ नये. नक्की विनयभंग झाला आहे का ते तपासाव लागेल. विनयभंग झाला आहे का नाही याचा निर्णय कोर्ट देईल. मी तो व्हिडीओ पाहिला. त्यात जो समोर येईल त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड करताना दिसत आहे. वैर भावना राजकीय नेत्यांच्या मनात येऊ नये. त्यांनी संतापून किंवा दुःखी होऊन राजीनामा देऊ नये. जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला हे दुर्देवी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे. राजकारणात एकमेकांच्या विरोधात हिन पातळीवरचे वाभाडे काढणे सुरू आहे. ते बरोबर नाही, या शब्दांत नीलम गोऱ्हे यांनी निशाणा साधला.
केतकी चितळेच्या रुपाने महाराष्ट्रात मिनी कंगना राणावत जन्माला येत आहे
केतकी चितळे यांना मी मदत केली होती. पण तिची काही विधाने पाहता केतकी चितळे हिच्या रूपाने महाराष्ट्रात मिनी कंगना राणावत जन्माला येत आहे, अशी बोचरी टीका नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. तसेच बाल दिनानिमित्त मुंबईत एका शाळेत कार्यक्रम ठरला होता. तिथे मुख्यमंत्री उशिरा पोहचले. मुख्यमंत्र्यांनी शाळेतील विद्यार्थी म्हणजे गुवाहाटीला नेलेले आमदार नाही हे लक्षात घ्यायला हवे. ५० खोक्यांवरुन बोलले तर एवढे का वाईट वाटते? एका शिवसेना कार्यकर्त्याचा मला फोन आला होता. ते त्यांना रुमाल भेट देणार आहेत असा टोला नीलम गोऱ्हे यांनी लगावला.
दरम्यान, पोलीस नियमांनुसार गुन्ह्याची चौकशी करतील. या प्रकरणी तपास करतील. पडताळणी करतील. जी काही तक्रार आहे, त्यात तथ्य असेल किंवा नसेल, त्याप्रमाणे पोलीस पुढील कार्यवाही करतील. आमच्या सरकारने राजकीय सूड भावनेपोटी कोणतीही कारवाई केलेली नाही आणि करणारही नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"