Maharashtra Politics: ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना दिसत आहेत. हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीतून लढवून दाखवा. तुम्ही निवडून कसे येता हे पाहतो, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिले होते. यावर, पराभव व्हावा अशी तुमची इच्छाच असेल तर आम्ही तुमच्याविरोधात लढायला तयार आहोत, असा पलटवार शीतल म्हात्रे यांनी केला. यावळी शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर टीका केली. या टीकेचा ठाकरे गटातील रणरागिणीने खरपूस शब्दांत समाचार घेतला.
आदित्य ठाकरे तुम्ही वरळीतून आव्हान देत आहात हे ऐकले. तुम्ही आव्हान देण्याची गरज नाही. एवढीच इच्छा असतील तर एकनाथ शिंदे साहेबांचे जे कट्टर सैनिक आहेत, आमच्यासारखी लोक ते तुमच्यासोबत लढायला तयार आहेत, असे शीतल म्हात्रे म्हणाल्या. तुम्ही ज्या वरळीचे आमदार आहेत, तिथे तुमचे साधे जनसंपर्क कार्यालय नाही. लोकांना प्रश्न घेऊन जायचे असेल तर तुम्हाला भेटता येत नाही अन् तुम्ही वरळी ए प्लस करायला निघाला आहात, असा टोलाही त्यांनी लगावला. यानंतर, शिवसेना ठाकरे गटाच्या प्रियंका जोशी यांनी शीतल म्हात्रे आणि शिंदे गटावर घणाघाती टीका केली.
एका रात्रीत विकले जाणारे शिवसैनिक असूच शकत नाहीत
शीतल म्हात्रे यांनी आपल्या नावाआधी जे शिवसैनिक असे विशेषण लावले आहे, ते सर्वप्रथम पुसून टाकावे. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या शीतल म्हात्रेच होत्या. आणि एकाच रात्रीत मिंधे गटाला जाऊन मिळाल्या. एका रात्रीत विकले जाणारे शिवसैनिक असूच शकत नाहीत. तुम्ही शिवसैनिक हे विशेषण लावणे म्हणजे आमच्या खऱ्या शिवसैनिकांचा तो अपमान आहे. याशिवाय तुमच्या प्रवक्ते पदावर भाजप आणि खुद्द एकनाथ शिंदे यांना संशय आहे, असा पलटवार प्रियंका जोशी यांनी केला.
भाजप एकनाथ शिंदे यांच्या भल्यासाठी नाही
प्रियंका जोशी पुढे म्हणाल्या की, भाजप एकनाथ शिंदे यांच्या भल्यासाठी नाही. तुम्ही शिवसैनिकांना डिवचाल आणि आम्ही उद्या कामाला लागलो तर, जी जागा निवडून आली आहे, तीही राहणार नाही, असा पलटवार केला. तसेच शीतल म्हात्रे यांचे विधान घेऊन सांगते की, एकनाथ शिंदे यांना पडण्यासाठी आम्ही शिवसैनिक पुरेसे आहोत. त्यासाठी ठाकरे कुटुंबानी रणांगणात उतरण्याची काही आवश्यकता नाही. आम्हीच एकनाथ शिंदेंना पाडू, असे आव्हान प्रियंका जोशी यांनी दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"