Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. काही विषयांवरून राजकीय वातावरण ढवळून निघत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे एका कार्यक्रमासाठी एकाच कारमधून आले. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार राज्याचेच नव्हे तर देशाचे महत्त्वाचे आणि मोठे नेते आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासोबत प्रवास केला. हे कटुता संपविण्याचे पहिले पाऊल असेल. पण माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार यांच्यासोबत फार काळ कटुता ठेऊ शकत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीची कटुता निर्माण झाली आहे आणि ती संपविण्यासाठी मी पुढाकार घेईल, असे देवेंद्र फडणवीस काही महिन्यांपुर्वी म्हणाले होते. त्यावेळी मी त्या वक्तव्याचे स्वागत केले होते, असे संजय राऊत यांनी सांगितले.
सुडाचे राजकारण हे गेल्या ६०-६५ वर्षात कधीही पाहिले गेले नाही
महाराष्ट्राच्या राजकारणात एवढी टोकाची कटुता, द्वेष, सुडाचे राजकारण हे मागच्या ६०-६५ वर्षात कधीही पाहिले गेले नाही. राजकीय मतभेत हे होतच असतात. पण ज्यापद्धतीचे राजकारण महाराष्ट्रत होत आहे, ही आपली परंपरा नाही. सत्तांतरे होत असताना इतक्या टोकाची कटुता कधी पाहिली नाही. देवेंद्र फडणवीस कटूता संपविण्याचे नेतृत्व करत असतील तर महाराष्ट्र नक्कीच त्यांचे स्वागत करेल. महाराष्ट्राच्या राजकारणात जी विषाची उकळी फुटली आहे, ती संपुष्टात आली पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, मंत्रिमंडळात बदल करणे हा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. अनेकदा मंत्र्यांच्या भ्रष्टाचारामुळे किंवा त्यांचा परफॉर्मेन्स शून्य असेल तर त्यांना मंत्रिमंडळातून काढलं जातं. कुणालातरी राजकारणात संधी द्यायची असेल तर मंत्रिमंडळातून काढलं जातं. मंत्रिमंडलात फेरबदल झाले तरी तेच पत्ते पिसले जातील. महाराष्ट्रातील सरकार मात्र घटनाबाह्य आहे. लवकरच घटनेचा हातोडा या घटनाबाह्य सरकारवर पडेल, असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"