Maharashtra Politics: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, शिंदे गटातील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून राजीनाम्याच्या मागणी महाविकास आघाडीचे नेते आग्रहीपणे करताना दिसत आहेत. अनेक मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. तसेच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये बॉम्बवॉर सुरू असल्याचे दिसत आहे. यातच शिंदे गटातील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईल भाजपच आम्हाला देते, असा मोठा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे.
भाजप आणि शिंदे गट दोघे मिळून सरकार चालवत आहे. पण प्रकरण एकाच गटाचं निघत आहे. त्यावरून फाईल कोण देतेय हे समजून जा. आम्हाला भाजपचेच लोक फाईल पुरवत आहेत, असा गौप्यस्फोट करत, ज्या प्रकारे विरोधी पक्षाचा हल्ला सुरू आहे. त्यावरून सरकार नक्कीच पळ काढत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
ही प्रकरणे देणारे तुमचेच सहकारी आहेत
अधिवेशनात सीमाप्रश्नाचा ठराव येणार होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सीमावादाचा ठराव येत असताना इतर कोणतेही विषय घेऊ नका म्हणून सांगितले. त्यामुळे आम्ही मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे विधानसभेत मांडली नाहीत. अनेक प्रकरणे आहेत. ही प्रकरणे देणारे तुमचेच सहकारी आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एनआयटी घोटाळा हे एक टोक आहे. अजून असंख्य प्रकरणे बाहेर येतील. महाराष्ट्रातील असो, दिल्लीतील असो की इतर राज्यातील सरकारमधील भ्रष्टाचारी लोक राजीनामा देत नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, हा भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन पळणे फडणवीस आणि भाजपला जड होत असेल. हे सर्व लोक अलिबाबा चाळीस चोरमधले आहेत. हळूहळू चाळीस आमदारांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर येतील, असे संजय राऊत म्हणाले. अधिवेशनात महाविकास आघाडीच्या आमदारांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सभागृह दणाणून सोडले. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर, दिल मांगे मोर, सत्तार आहे चोर… अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"