Maharashtra Politics: केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हावर सुनावणी सुरू आहे. पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह कुणाला मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, ठाकरे गट आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच शिवसेना ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. खोके मिळाल्याने सोडून गेले, प्रत्येक वेळा भूमिका बदलतात, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊतांच्या धमक्यांमुळे आम्ही शिवसेना सोडली, असा दावा सातत्याने शिंदे गटाकडून केला जातो. यावर संजय राऊत यांनी शिंदे गटावर पलटवार केला आहे. बंड करून गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दंडुक्यांनी मारणम्याची भाषा आपण केलीच नव्हती, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते खोके मिळाल्यामुळे सोडून गेले. हा धमकीचा विषय आत्ता आलाय. ते ज्या माझ्या भाषणाचा उल्लेख करतायत, ते भाषण मी हे लोक सुरतवरून गुवाहाटीला पोहोचल्यानंतर दहिसरला केलेले आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
त्यांनी एकदा स्पष्ट केले पाहिजे की नेमके ते का सोडून गेले?
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, लाठ्या मारा किंवा त्यांना दंडुक्याने बडवून काढा असे भाषण मला वाटते त्यांच्या गटात असणाऱ्या शीतल म्हात्रे यांनी अलिबागच्या सभेत केले होते. त्यांनी एकदा स्पष्ट केले पाहिजे की, नेमके ते का सोडून गेले? मी धमक्या दिल्यामुळे सोडून गेले की शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेससह युती केल्यामुळे सोडून गेले की हिंदुत्वाच्या संदर्भात त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या म्हणून ते सोडून गेले. त्यांनी एकदा स्पष्ट केले पाहिजे. ते प्रत्येक वेळा भूमिका बदलतात, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली. तसेच निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय अशी प्रत्येक लढाई ते हरणार आहेत, असा दावाही संजय राऊतांनी केला.
दरम्यान, संसदेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावरुन संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. अर्थसंकल्पात घोषणा फार असतात. इतकीच अपेक्षा आहे की दोन-पाच उद्योगपतींना, कॉर्पोरेट विश्वाला समोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडला जाऊ नये. या देशात शेतकरी, बेरोजगार, कष्टकरी, मजूर आहेत. ते आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर झाला, तर त्याचे स्वागत केले जाईल. दोनजण खरेदी करतात, दोनजण विकतात असे जे राहुल गांधी म्हणतात, फक्त दोघांसाठीच देशाची अर्थव्यवस्था राबवली जाते, त्यामुळे हा देश आर्थिकदृष्ट्या खड्ड्यात जाईल, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"