Shiv Sena Thackeray Group Vs BRS KCR: केसीआर यांच्या कर्तबगारीविषयी कुणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही, पण ते ज्या प्रकारचा डाव खेळू पाहत आहेत तो त्यांचा डाव नसून दुसरेच कोणीतरी त्यांना वापरून घेत आहे. त्यामुळे तेलंगणातले त्यांचे तेलही जाईल व महाराष्ट्रातले तूपही हाती लागणार नाही. केसीआर यांच्याकडे धन–संपत्तीची कमी नाही. ते बेफाम वाटप करीत आहेत. त्यानिमित्ताने अडगळीत पडलेल्यांची गरिबी हटणार असेल तर ती त्यांनी खुशाल हटवून घ्यावी. पंढरपूरचा विठोबा हा जागृत आहे. हे सर्व तो उघड्या डोळ्याने पाहतो आहे, चिंता नसावी!, या शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केसीआर यांनी महाराष्ट्रात केलेल्या शक्तिप्रदर्शनाचा खरपूस समाचार घेतला.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भारत राष्ट्र समिती असा पक्ष स्थापून राष्ट्रीय राजकारणात येण्याचे नक्की केले. खरं तर त्याची गरज नव्हती. त्यांचा एक प्रादेशिक पक्ष होता व त्यांचे उत्तम चालले होते, पण राष्ट्रीय राजकारणाचा किडा राव यांच्या डोक्यात घुसला तो घुसलाच. भाजपचे राजकारण हे सदैव असेच असते. महाराष्ट्रात आधीच भाजपने अनेक घोडे व खेचरे ‘बी’ टीम म्हणून सजवून ठेवली आहेत. त्यात तेलंगणातील आणखी एका पक्षाची भर पडली आहे इतकेच. राव हे तेलंगणाचे दोनवेळा मुख्यमंत्री झाले. तेथील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणाऱ्या अनेक योजना त्यांनी यशस्वीरीत्या राबवल्या. तरीही आता त्यांच्या पक्षाला तेलंगणात घसरण लागली आहे व २०२४ मध्ये केसीआर यांचा पक्ष सत्तेत राहील की जाईल, याची खात्री कोणीच देऊ शकत नाही, असा दावा शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केला आहे.
भाजपची ‘बी’ टीम म्हणून काम करत आहे काय?
२०१९ सालापासून भाजप ज्या ‘एमआयएम’च्या ओवेसींचा वापर मतविभागणीच्या कामासाठी करून घेत आहे, त्या ओवेसी यांचे ‘हेडक्वॉर्टर’सुद्धा हैदराबादच आहे. ओवेसी हे मतांचे विभाजन करण्यासाठी तेव्हा महाराष्ट्रात व इतर राज्यांत गेले. त्यांनी त्यांची कामगिरी चोख बजावली, पण आता ओवेसींचा डाव लक्षात आल्याने मुस्लिम व दलित हे एमआयएमच्या कच्छपी लागणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच भाजपने आता ओवेसी यांच्या जागी केसीआर यांना उतरवले आहे काय? केसीआर व त्यांचा पक्ष भाजपची ‘बी’ टीम म्हणून काम करत आहे काय? असा प्रश्न पडला आहे. शरद पवार यांनीसुद्धा तसे बोलून दाखवले आहे. भाजपला स्वतःचे विचार व जनाधार नाही, असा दावा करत ठाकरे गटाने टीकास्त्र सोडले आहे.
इतक्या वर्षांत त्यांच्यातील विठ्ठलभक्तीची ऊर्मी कधी उसळून आली नाही
केसीआर हे त्यांच्या ६०० वाहनांच्या ताफ्यासह महाराष्ट्रात आले. त्यांचा ताफा पंढरपुरात आला व त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. केसीआर यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेणार, मंदिरावर पुष्पवृष्टी करणार वगैरे बातम्या आधी प्रसिद्ध झाल्या होत्या. हे सगळे आश्चर्यकारक आहे. वास्तविक केसीआर हे महाराष्ट्राच्या सीमेवरच असतात. अनेक वर्षे ते सत्तेत आहेत. मात्र इतक्या वर्षांत त्यांच्यातील विठ्ठलभक्तीची ऊर्मी कधी उसळून आली नाही, पण २०२४ च्या निवडणुकांना सामोरे जाताना ती आली. केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाची मोठमोठी होर्डिंग्ज, फलक महाराष्ट्रात लागले. त्यांनी त्यांच्या पक्षाची कार्यालये मराठवाडा व इतर ठिकाणी उघडली. सर्वच पक्षांतील नाराजांना मोठमोठी आमिषे दाखवून ‘खरेदी-विक्री’ संघ उघडला, असा घणाघात ठाकरे गटाने केला.
दरम्यान, महाराष्ट्रात नाराज व असंतोषी लोकांना केसीआर यांनी नवे व्यासपीठ निर्माण करून दिले. हा पक्ष महाराष्ट्रात निवडणुका लढविणार व जमेल तितकी मतविभागणी घडवून भाजपच्या राजकारणास सहाय्य करणार हा डाव मऱ्हाठी जनतेने वेळीच ओळखायला हवा. वरकरणी केसीआर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भावनिक आवाहन करीत आहेत. शेतकऱ्यांच्या नावाने मतांचा जोगवा मागत आहेत. मात्र त्यांचा भारत राष्ट्र समिती हा पक्ष भाजपसाठी मतविभागणीचे ‘कार्पेट’ अंथरण्याचे काम करेल, असेच एकंदर चित्र आहे. वास्तव हे आहे की, तेलंगणात केसीआर यांच्या पक्षाच्या पायाखाली हादरे बसत आहेत. मात्र त्याचा बदला ते महाराष्ट्रात घेत असतील तर ते देशहिताला चूड लावीत आहेत, या शब्दांत ठाकरे गटाने हल्लाबोल केला आहे.