Shiv Sena Thackeray Group: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहेत. मनिषा कायंदे, शिशिर शिंदे आणि नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दुसरीकडे, पक्षबांधणीसाठी उद्धव ठाकरे दौऱ्यावर आहेत. राज्यातून अनेकांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा मिळत आहे. हजारो शिवसैनिक आम्ही उद्धव ठाकरेंसोबत आहोत, अशी ग्वाही देत आहेत. अशातच आता कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेची सत्ता मुंबई महानगरपालिका अन् महाराष्ट्रात येणार, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
विदर्भ दौऱ्याहून परत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विविध विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत उपस्थित होते. या बैठकीत नेमकी कशावर चर्चा झाली, काय झाले, याविषयी सुनील राऊत यांनी माहिती दिली. बैठकीसाठी बोलावले होते. उद्धव ठाकरेंना पाहिल्यानंतर आम्हाला एक एनर्जी येते. आताही एनर्जी घेऊन आम्ही आमच्या विभागात जाणार आहोत. पुन्हा एकदा शिवसेना मजबूत करण्याचे काम करणार आहोत, असे ते म्हणाले.
शिवसेनेची सत्ता मुंबई महानगरपालिका अन् महाराष्ट्रात येणार
आमच्याकडे कोणीही अस्थिर नाही. आम्ही सर्व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे निष्ठावान शिवसैनिक आहोत. उद्धव ठाकरे यांनी योग्य मार्गदर्शन केले असून पक्ष मजबूत आहे, संघटनाही मजबूत आहे. शिवसेनेची सत्ता कुठल्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेत आणि महाराष्ट्रात येणार आहे. आपण आपल्या पद्धतीने काम करा. लोकांशी संपर्क वाढवा, असे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शिंदे गटात काही जण गेले असले तरी बाळासाहेबांवर प्रेम करणारा निष्ठावंत शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत आहे. आमची निष्ठा उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहे, त्यामुळे आम्हाला चिंता करायची गरज नाही. जे गेले ते उपरे होते. अशी प्रतिक्रिया सुनिल राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.