Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत. खासदार गजानन कीर्तिकर यांच्यानंतर आता ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या म्हणून ओळख असलेल्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पतीने शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना सुषमा अंधारे यांनी मोठे भाकित केले आहे. आगामी चार ते सहा महिन्यात शिंदे सरकार कोसळेल, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.
शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर करणाऱ्या दीपाली सय्यद यांच्यावरही सुषमा अंधारे यांनी टीकास्त्र सोडले. तिकडे प्रवेश केला पाहिजे असे त्यांना वाटत असेल तर ठीक आहे. सत्तास्थानी प्रवेश करणे सोप्पे असते. कारण तिकडे करिअर पटकन होते. पण संघर्ष काळ सहन करणे अवघड आहे. आमची शिवसेना संक्रमणकाळात आहे. पण आम्ही लढायचे ठरवले आहे. जे जात आहे. त्यांना शुभेच्छा. आम्ही लढत राहणार आहोत, असे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले.
४-६ महिन्यात शिंदे सरकार कोसळेल
शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे नाराज आहेत. त्याबाबत सुषमा अंधारे यांना विचारण्यात आले. त्यावर, त्यांच्यातील नाराज आमदार आमच्यात येतील. तसे चित्र दिसत आहे. सुहास कांदे यांनी अगदी स्पष्ट भूमिका मांडली आहे. दादा भुसेंवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुहास कांदेंनी खदखद व्यक्त केली. यापूर्वी अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या दालनातून चिडचिड करत बाहेर आले होते. चौकशी टाळण्यासाठी प्रताप सरनाईकांनी पक्ष बदलला. पण तरीही त्यांच्या मागचा चौकशीची ससेमिरा सुटलेला नाही. सरनाईक त्यांचा मतदारसंघ भाजपला सोडत नाही, तोपर्यंत भाजप त्यांना मोकळेपणाने श्वास घेऊ देणार नाही. या सर्व कारणाने हे सरकार कोणत्या दिशेने जातेय हे स्पष्ट आहे. हे असेच कुरघोड्यांचे राजकारण आणि माणसांना ओलीस ठेवण्याचे राजकारण सातत्याने सुरू राहणार असेल तर हे सरकार जास्त काळ टिकेल असे वाटत नाही. माझ्या निरीक्षणानुसार फार फार चार सहा महिने हे सरकार चालू शकेल, असे मोठे भाकित सुषमा अंधारे यांनी वर्तवले आहे.
दरम्यान, सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थिती बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. या राजकीय खेळीने सुषमा अंधारेंना फटका बसल्याचं मानले जात आहे. सुषमा अंधारे या मुलुखमैदानी तोफ नसून त्यांना मीच घडवले असल्याचे वैजनाथ वाघमारेंनी स्पष्टपणे सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"